ग्राहकांची मागणी
वैभववाडी प्रतिनिधी
एडगांव – करुळ सीमेवर वीज खांबावरील चारही वीज वाहिन्या तुटून पडल्या आहेत. त्या वीज वाहिन्या जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या असून संबंधित प्रशासन याकडे डोळेझाक करत आहेत. वसुलीच्या नावाखाली मीटर तोडण्याची धमकी देणार्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या तुटलेल्या वीजवाहिन्या अगोदर जोडाव्यात अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
वैभववाडी – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गानजीक एडगांव – करुळ सीमेवर पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वादळात जवळपास चार खांबावरील वीज वाहिन्या कोसळून जमीनदोस्त झाल्या. दरम्यान वीज वितरण कंपनीने केवळ विद्युत् पुरवठा बंद करण्याचे काम केले. मात्र अद्यापही या सर्व वाहिन्या जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये पाळीव जनावरे अडकून पडत आहे. संबंधित ग्राहकांनी याबाबत वारंवार वायरमन व इतर कर्मचा-यांशी संपर्क केला. परंतु त्यांनी जोडणी कडे दुर्लक्ष केले. खांबावरील चारही वाहिन्या तुटून पडल्याने गेली पंधरा दिवस येतील दोन ते तीन घरांचा पुरवठा खंडित झाला आहे. संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याने यंत्रणेचा सावळा गोंधळ समोर आला आहे.
फोटो : एडगांव करूळ सीमेनजीक खांबावरील तुटलेल्या वीजवाहिन्या छाया संजय शेळके वैभववाडी
