*अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य सेविका यांना २०२०-२१ आर्थिक वर्षातील पुरस्कार जाहीर

माधुरी बांदेकर यांनी केले पुरस्कार जाहिर : २० जानेवारी रोजी वितरण

*💫सिंधूदुर्गनगरी दि. १९-:* एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जिल्हा परिषद अंगणवाडी केंद्रातील कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य सेविका यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महिला व बाल कल्याण समिती सभापती माधुरी बांदेकर यानी हे पुरस्कार जाहिर केले. ३ मुख्य सेविका, प्रत्येकी ४९ अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आठ मिनी अंगणवाडी सेविका अशा १०९ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. २० रोजी सकाळी ११ वाजता नवीन डीपीडीसी सभागृहात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, असे यावेळी सौ बांदेकर यानी सांगितले. सभापती सौ बांदेकर यानी आपल्या दालनात मंगळवारी याबाबत सकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी महिला व बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सभापती सौ बांदेकर यानी बोलताना ‘जिल्ह्यात ४९ अंगणवाडी बीट आहेत. प्रत्येक बीटमध्ये एक अंगणवाडी सेविका व एक मदतनीस यांची निवड करण्यात आली आहे. तसेच आठ तालुक्यातून आठ याप्रमाणे मिनी अंगणवाडी सेविकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील तीन मुख्य सेविकांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण बुधवार दि २० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमाद्वारे नवीन डीपीडीसी सभागृहात केले जाणार आहे. राष्ट्रीय बचतपत्र, प्रशस्तिपत्र, गौरव पदक व भेटवस्तू असे या पुरस्कारांचे स्वरूप असल्याचे यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page