स का पाटील महाविद्यालयात करण्यात आला सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
मालवण (प्रतिनिधी)
तळागाळातील विद्यार्थी शिकावा, तो मोठा व्हावा या उदात्त हेतूने प्रा. डॉ. आर. एन.काटकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केले. विद्यार्थी घडवितानाच समाजाच्या उन्नती मध्येही डॉ. काटकर यांनी मोलाचे असे योगदान देत समाजाशी नाते घट्ट केले. विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त बिंबवतानाच विद्यार्थ्यांशी मित्र बनून वागणारे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या डॉ. काटकर यांच्या सेवानिवृत्तीने एक पोकळी निर्माण होणार आहे. विद्यार्थिप्रिय, शिस्तप्रिय आणि समाजाशी नाते घट्ट करणाऱ्या डॉ. काटकर यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा अशा भावना मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आर. एन. काटकर यांच्या सेवनिवृत्तीपर समारंभात मान्यवरांनी व्यक्त केल्या.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील भूगोल विषयाचे प्रा. डॉ. रामचंद्र काटकर आणि कार्यालय अधीक्षक श्री. प्रमोद गोसावी यांचा सेवा निवृत्ती पर सत्कार समारंभ बुधवारी महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी डॉ. काटकर व श्री. गोसावी यांना महाविद्यालयाच्या वतीने कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, संस्था सदस्य महादेव पाटकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुधीर धुरी, सचिव अमेय देसाई, बाबूकाका अवसरे, संदेश कोयंडे, सौ. काटकर, सौ. गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघ, एनसीसीचे अधिकारी व कॅडेट्स, नातेवाईक यांच्यातर्फेही डॉ. काटकर व श्री. गोसावी यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रा. एम. आर. खोत, प्रा. देविदास हारगिले, प्रा. कैलास राबते, प्रा. सौ. बर्वे, प्रा. खोबरे, प्रा. सुमेधा नाईक, प्रा. हसन खान, महादेव पाटकर, सुधीर धुरी, महादेव पाटकर, प्रा. बी. एच. चौगुले, नंदू देसाई, बाबूकाका अवसरे आदींनी डॉ. काटकर व प्रमोद गोसावी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी चौके हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक ना. धा. चव्हाण यांनी एक जिवलग मित्र म्हणून डॉ. काटकर यांच्याशी असलेल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी डॉ. काटकर हे नेहमीच वडीलधारे व गुरू म्हणून कायम पाठीशी उभे राहिले. महाविद्यालयासाठी केवळ प्राध्यापक म्हणून काम न करता त्या पलीकडे जाऊन योगदान दिले. माणसे जोडून समाजासाठीही काम केले, त्यांच्यातील गुण आजच्या पिढीने आत्मसात करावे असे सांगितले. तर बाळासाहेब पंतवालावलकर यांनीही डॉ. काटकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सेवानिवृत्तीने एक पोकळी निर्माण होणार आहे, असे सांगत पुढील जीवनास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. काटकर म्हणाले, प्राध्यापक म्हणून काम करताना आपणास सर्वांचे सहकार्य लाभले, माझा स्वभाव स्वीकारून संस्थेने सामावून घेतले. आयुष्यभर पुरेल अशा प्रेमाचे, आठवणींचे गाठोडे पाठीवर घेऊन मी निवृत्त होत आहे. मालवण वासीयांनीही मला साथ दिली. माझे दोष खिशात टाकून माझ्या गुणांचे कौतुक केले. संस्थेसाठी आपले यापुढेही सहकार्य लाभेल. माझ्या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी प्रमोद गोसावी यांनीही मनोगत व्यक्त करत सत्कार व सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
यावेळी प्रा. एच. एम. चौगले यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. बी. एच. चौगुले यांनी केले. तर आभार प्रा. सुमेधा नाईक यांनी मानले. यावेळी प्रा. अन्वेषा कदम, प्रा. मिलन सामंत यांसह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, महेश काळसेकर, हेमंत रामाडे, शुभांगी सुकी, दीपक कुडाळकर, हरेश देऊलकर, किरण ओरसकर आदी व इतर उपस्थित होते.
