ओरोस ता.15-:
सिंधुदुर्ग जिल्हा कला, परंपरा असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात संगीत, नाट्य व साहित्य क्षेत्रातील दिग्गज माणसे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाला आल्यावर मला माहेरला आल्या सारखे वाटते. कोरोनामुळे दोन वर्षानंतर जिल्हा परिषदेचे स्नेहसंमेलन होत आहे. उत्तम कलाकार असलेला माणूस चांगला अधिकारी बनू शकतो. कारण कलाकार लोकांचे जीवन जगत असतो. त्या प्रमाणे अधिकाऱ्यांनी आपल्या समोर समस्या घेवून आलेल्या नागरिकांना वागणूक चांगली दिल्यास तो चांगला अधिकारी बनू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा वार्षिक स्नेहसंमेलन सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आज संपन्न झाला. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याहस्ते दीप प्रज्वलननाने व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, कणकवली – देवगड गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, वेंगुर्ला गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, समाजकल्याण अधिकारी शाम चव्हाण, जिल्हा पाणी व स्वच्छता उपमुख्य अधिकारी विनायक ठाकूर, जिल्हा पशसंवर्धन विकास अधिकारी डॉ विद्यानंद देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, माजी वित्त v बांधकाम सभापती संतोष साटविलकर आदी उपस्थित होते.
