कालव्यात पाणीच नसल्याने पाणी वापर संस्थेचा उपयोग काय? : रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांचा सवाल; चार दिवशीय निवासी प्रशिक्षण
⚡बांदा ता.१५-: सिंधुदुर्गातील तिलारी प्रकल्पाचे पाणी गेली 40 वर्षे झाली तरी आमच्यापर्यत पोहचले नाही. कालव्याचे पाणी अर्ध्यापर्यंत म्हणजे आमच्या शेजारी आले परंतु पुढे सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल मध्ये काही केल्या येत नाही अन अधिकाऱ्यांच्या तारखांवर तारखा मिळतात. या सर्व प्रक्रियामध्ये आमची प्रस्तावित पाणी वापर संस्था तशीच राहणार काय? आम्ही अल्पदरात दिलेल्या जमिनीचा हवातसा लाभ मिळाला नसल्याने त्याचा उपयोग काय. जर पाणीच नाही तर पाणी वापर संस्थेचे काय करणार असा सवाल रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी प्रशिक्षकांना केला.
इंडिया एनपीम, नवी दिल्ली, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन व वाल्मी औरंगाबाद यांच्या संयुक्त तत्वावधानात राज्यातील कॅड डब्लूएम अंतर्गत असलेल्या 22 प्रकल्पातील पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसाठी जल व भूमी व्यवस्थापन संस्था(वाल्मी) औरंगाबाद आयोजित चार दिवशीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सुरेश गावडे बोलत होते. प्रशिक्षणाचे उदघाटन औरंगाबाद वाल्मी महासंचालक तथा मृदुवा जलसंधारण आयुक्त मधुकरराजे अर्दड, सहसंचालक नरेंद्र कटके, एमडब्लूआरआरए सेवानिवृत्त सचिव डॉ. एस. ए. कुलकर्णी, सामाजिक शास्त्र विद्या शाखा वाल्मी प्राध्यापक व प्रमुख डॉ. आर. पी. पुराणीक, कडा अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, सामाजिक शास्त्र विद्या शाखा सहायक प्राध्यापक डॉ. मोहन नारखेडे, इंडिया एनपीमचे अध्यक्ष फणीश सिन्नार, डॉ. अविनाश गरूडकर, डॉ. दिलीप दुर्बुडे व वाल्मीचे सर्व प्राध्यापक, सिंधुदुर्ग सावंतवाडीतील मडुरा ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश वालावलकर, कास पाणी वापर संस्था सदस्य प्रवीण पंडित, सातोसे माजी सरपंच आबा धुरी, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक तसेच अन्य पदाधिकारी व 15 जिल्ह्यातून आलेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रकाश वालावलकर म्हणाले की, कोकण व विदर्भात जलसंपदा विभागाची उलट परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात कालव्यांना लागलेल्या गळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पाणी गळती बंद करण्याचे सांगूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भुईमूग, चवळी, मिरची, नाचणी अशी अनेक पिके घेता येत नसल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग-सासोलीतील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडीत सांगितले होते आणि याला सर्वस्वी अधिकारीच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सुरेश गावडे म्हणाले की, आमची पाणी वापर संस्था केवळ प्रस्तावित असून आम्ही एव्हढी धडपड करतो. आमची मुख्य समस्या समजायला अशावेळी अधिकारी उपस्थित असलेले तर योग्य जाब विचारता आला असता. उपस्थित प्रशिक्षकांनी समाधानकारक उत्तर दिल्यान सिंधुदुर्गातील पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी शांत झाले. आलेल्या पंधरा जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना पाणी वापर संस्था संदर्भात सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
