आम. वैभव नाईक यांनीही न.प. प्रशासनास दिल्या काम पूर्ण करण्याच्या सूचना
⚡मालवण ता.१४-: मालवण शहरात पावसाळ्यापूर्वी करावयाची गटार खोदाई अर्धवट स्थितीत केली गेल्याने नागरिकांसह विरोधकांकडून नगरपालिका प्रशासनावर नाराजी व आरोप झाल्यानंतर मुख्याधिकारी संतोष जिरगे व प्रशासनाची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठराखण केली असताना आज शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी रखडलेली गटार खोदाई, तसेच शहरातील कचरा प्रश्नी आमदार वैभव नाईक यांच्यासमोर मुख्याधिकाऱ्यांच्या समक्षच तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक करणारे पदाधिकारी आणि त्यांच्या कारभारावर नाराज असणारे पदाधिकारी असे दोन गट शिवसेनेत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, याप्रश्नी गटार खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला कामगार मिळत नसल्याचे नगरपालिका अधिकारी यांनी सांगताच आमदार नाईक यांनी ‘मी लमाणी कामगार उपलब्ध करून देऊ का’ ? असे सांगत कामगार उपलब्ध करणे ही काम घेतलेल्या ठेकेदाराची जबाबदारी आहे. कारणे नको काम वेळेत पूर्ण करून घ्या. कचरा समस्याही सुटण्यासाठी नियोजन करा, अश्या सूचना आम. वैभव नाईक नगरपालिका प्रशासनास दिल्या.
आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण पालिका कामांचा आढावा मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्याकडून घेतला. यावेळी नगरपालिका अधिकारी यासह उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, उपशहर प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, यशवंत गावकर, संमेश परब, पंकज सादये, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, अमेय देसाई, सिद्धार्थ जाधव, नरेश हुले, प्रसाद आडवणकर, मनोज मोंडकर यासह अन्य उपस्थित होते.
पावसाळा आला तरी गटार खोदाई पूर्ण न झाल्याने तसेच ज्या ठिकाणी गटार खोदाई झाली ते कामही योग्य न झाल्याबाबत शिवसेना पदाधिकारी यांनी समस्यांचा पाढा वाचला. गटार खोदाईचे नियोजन पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधीच होऊन पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाले पाहिजे होते. आता कसले नियोजन करता असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सुनावले.
यावेळी मुख्याधिकारी जिरगे यांनी गटार खोदाई साठी टेंडर दोन वेळा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता सिंधुदुर्ग बाहेरील ज्या ठेकेदार एजन्सीने टेंडर घेतले आहे त्याला गटार खोदाईस कामगार मिळत नाहीत असे सांगितले. यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामगार नाहीत हा ठेकेदार याचा प्रश्न आहे. काम वेळेत व योग्य पद्धतीने झाले पाहिजे अशी भूमिका मांडली.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, गतवर्षी गटार खोदाई वेळेत पूर्ण व्हावी यासाठी नगरसेवक यतीन खोत यांनी सहकार्य केले. कोरोना काळ असताना ठेकेदारास कामगार उपलब्ध केले. मात्र यतीन खोत यांचे काम म्हणून नाहक चर्चा होऊन बदनामी झाली. सहकार्य केले म्हणून बदनामी होणार असेल तर कोण सहकार्य करण्यास पुढे येणार नाही याचा विचार झाला पाहिजे. आता ठेकेदारास कामगार मिळत नाहीत तर मी लमाणी कामगार उपलब्ध करून देऊ का ? असा सवाल आम. नाईक यांनी उपस्थित करत नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर गटार खोदाई पूर्ण करून घ्यावी अश्या सूचना केल्या. तसेच कचरा समस्येतूनही शहर वासीयांची मुक्तता व्हावी यासाठी प्रशासनाने नियोजन करावे असेही आमदार नाईक यांनी सांगितले.
मालवण शहरात वायरी गर्देरोड रस्ता काम संबंधित ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अन्य काही कामेही एका ठेकेदाराने पूर्ण केली नाहीत. याबाबत तपस्वी मयेकर, मंदार केणी यांनी तक्रार मांडली. यावर आम. नाईक यांनी कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार यांची बिले नगरपालिका प्रशासनाने मागे ठेवावीत, असे सांगितले.
