⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: मळगाव-तेलकाटावाडी येथे सौभाग्यवती महिलांचा वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने ब्राम्हणाच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवोदित जोडप्यांनीही वडाची पूजा करून वटपौर्णिमा सण साजरा केला.
सौभाग्यवती स्त्रियांच्या महत्वाच्या सणांपैकी वटपौर्णिमा हा एक महत्वाचा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात.
या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. पती-पत्नीच्या नात्यातील स्नेहबंध दृढ करणारा असा हा सण मळगाव तेलकाटावाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी येथील सुहासिनी महिलांनी एकत्र येत वडाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना वडाजवळ केली. यावेळी महिलांनी वडाला दोरा गुंडाळून सात प्रदक्षिणा घातल्या. पूजेनंतर महिलांनी एकमेकींना सौभाग्याचे लेणे हळद-कुंकू लावले. वटपौर्णिमेनिमित्त आज सकाळपासूनच महिलांची वडाजवळ लगबग सुरू झाली होती. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी मळगाव बाजारपेठेतही महिलांनी काल व आज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आंबे, हळदी-कुंकू, दोरा, अननस, फणस, सफरचंद, पेरू, इतर फळे आदी सणासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी सकाळी मोठी वर्दळ सुरू होती. मळगाव येथील इतर वाडीतील महिलांनी वटपौर्णिमा सण साजरा केला.
