जिल्हा बँक व नाबार्डचे आयोजन..
⚡मालवण ता.०६-:
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बँकेशी संलंग्न महिला बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन आंगणेवाडी येथे जत्रा कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वा. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री व जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक नितेश राणे यांच्या हस्ते व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डांटस, संदीप परब, मेघनाद धुरी, नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक दीपाली माळी, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक बाळ परब, आंगणेवाडी विकास समितीचे अध्यक्ष सतीश आंगणे, जिल्हा अभियान व्यवस्था कक्ष (उमेद) चे व्यवस्थापक वैभव पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी उदघाटन कार्यक्रमासं सर्वांनी उपस्थित राहावे तसेच या प्रदर्शनास सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व संचालक मंडळ यांनी केले आहे.
