केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक;मुंबई केंद्र व राज्याची संयुक्त बैठक घेण्याचे दिले आश्वासन
⚡मालवण ता.१३-:
पर्यटन हा देशाचा एक मोठा व्यवसाय आहे. सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसाय हा येथील स्थानिक व्यावसायिकांनी स्वतःच्या हिमतीवर वाढविला असून ते कौतुकास्पद आहे. येथे मूलभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्गला केंद्र सरकारने दत्तक घेतला असल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी निश्चितच वेगळे प्रयत्न करावे लागतील. येथील पर्यटन व्यासायिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्या असून याबाबत येत्या काही दिवसात मुंबईत राज्याचे पर्यटन मंत्री, पर्यटन सचिव, केंद्राचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करून समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी मालवण येथे पर्यटन व्यावसायिकांच्या चर्चासत्रात बोलताना केले.
जिल्हा दौऱ्यावर असलेले केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज सायंकाळी मालवणला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर, कोकण रिजन आणि पर्यटन समिती (मासिया), पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या विषयावर हॉटेल चिवला बीच येथे चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी मंत्री श्रीपाद नाईक यांचा जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या हस्ते सत्कार करून स्वागत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी संस्थानचे लखम राजे भोसले, चंद्रशेखर पुनाळेकर, उमेश गाळवणकर, भाजपचे अशोक सावंत, संध्या तेरसे, नकुल पार्सेकर, तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, मंगेश जावकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरअध्यक्षा सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा सावंत आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी पर्यटन व्यावसायिकांनी विविध समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. दादा वेंगुर्लेकर यांनी पर्यटन विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा व्हाव्यात अशी मागणी केली. वेंगुर्ला येथील महेश सामंत यांनी व्यावसायिकांना शासनाने कोणताही आधार दिला नाही अशी खंत व्यक्त करत दुर्लक्षित पर्यटन स्थळे प्रसिद्धीस आणली पाहिजेत, तिथे जाणारे रस्ते केले पाहिजेत, जलक्रीडा व्यवसायात सुसूत्रता आणावी, त्यासाठी परवाने जिल्ह्यातच दिले जावेत, पर्यटन व्यवसायास सेवा उद्योग म्हणून मान्यता द्यावी, चिपी विमानतळावर फ्लाईट वाढवाव्यात अशा मागण्या केल्या. डी. के. सावंत यांनी किनाऱ्यांवर मोठ्या बस जातील असे रस्ते नाहीत, तसे रस्ते करावेत बस जाणारे रस्ते पाहिजेत, गोव्या सारखी नैसर्गिक सुबत्ता येथे असूनही मूलभूत सुविधा नाहीत, गोव्याच्या धर्तीवर सुविधा निर्माण व्हाव्यात असे सांगितले. संजय खराडे यांनी ओव्हरहेड वीज वाहिन्यामुळे मुळे वीज पुरवठ्यात अडथळे येत असल्याने, भूमिगत वीज वहिनी व्हावी अशी मागणी केली. महेश जावकर यांनी मालवण पर्यटन विकासाचा आराखडा बनवावा, बंधार कम रस्ता व इतर सुविधांसाठी केंद्राकडून निधी मिळावा अशी मागणी केली. रामा चोपडेकर यांनी सुरक्षित व शाश्वत पर्यटन निर्माण होण्यासाठी स्थानिक पर्यटन संस्थांना विशेष अधिकार द्यावेत अशी मागणी केली. जितेंद्र पंडित यांनी पर्यटन व्यावसायिकांना भांडवलाची समस्या जाणवत असल्याने त्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तर अविनाश सामंत यांनी इतर पर्यटन राज्यांप्रमाणे सिंधुदुर्ग पर्यटनाचा ब्रँड तयार व्हावा अशी मागणी केली. तर महेश मांजरेकर यांनी पर्यटन विकासात बाधा ठरणाऱ्या सीआरझेड कायद्याचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, केंद्र सरकारने पर्यटन दृष्ट्या दत्तक घेतलेला सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा असल्याने त्यासाठी वेगळी पॉलिसी तयार व्हावी, शासकीय समिती तयार व्हावी, बारमाही पर्यटनासाठी सिवर्ल्ड प्रकल्प, आरमार म्युझियम, फिशरमन कल्चर सेंटर, दशावतार कल्चर सेंटर आदी प्रकल्प निर्माण व्हावेत. मोरयाचा धोंडा स्थळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे तसेच मालवणची किनारपट्टी बंधारा कम रस्ता व्हावा, किनारपट्टी सुजलाम सुफलाम होण्यासाठी मालवण ते देवबाग असा बंधारा कम रस्ता व्हावा, टुरिझम पोलीस संकल्पना राबवावी, पर्यटन व्यवसायाला अनुदान मिळावे अशा मागण्या केल्या.
यावर बोलताना मंत्री नाईक म्हणाले, राज्यातील पर्यटन वाढविण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. मात्र आपण केंद्र सरकार म्हणून जबाबदारी झटकत नाही. केंद्राच्या माध्यमातून पर्यटन विकासासाठी राज्य सरकारला जे द्यायचे ते दिले जातेय. विकास साधण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. येथील पर्यटनातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला हाताशी धरून काम करेल. स्थानिक पातळीवर आणखी पर्यटन संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. पर्यटनातून रोजगार वाढू शकतो त्यामुळे पर्यटनाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. सिंधुदुर्गातील पर्यटन विषयक समस्या सोडविण्यासाठी येत्या काही दिवसात मुंबईत बैठक घेतली जाईल असेही मंत्री नाईक म्हणाले.
