साने गुरुजींच्या विचारधारेने प्रेरीत शिक्षकांचे कार्य आदर्शवत – उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे

गुरुवर्य य. बा. चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना प्रदान

⚡मालवण ता.१३-: बॅ. नाथ पै सेवांगणच्या मालवण व कट्टा शाखेने शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विद्यार्थांसाठी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करुन शिक्षणाची चळवळ समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचविण्याची उत्तम कामगिरी केली आहे. साने गुरुजींच्या विचारधारेने प्रेरीत शिक्षकांचे कार्य आदर्शवत आहे. गुरुनाथ ताम्हणकर यांचे शैक्षणिक कार्य उत्तम असून त्यांच्याप्रमाणे कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अनेक शिक्षकांमुळे शिक्षण विभाग़ाची मान उंचावली आहे, असे प्रतिपादन जि.प. सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी श्री.रामचंद्र आंगणे यांनी येथे बोलताना केले.

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने दिला जाणारा गुरुवर्य य. बा. चोपडे शिक्षक गौरव पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रशाळा मसुरे नंबर १ चे उपक्रमशील शिक्षक श्री. गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. जि.प. सिंधुदुर्गचे उपशिक्षणाधिकारी श्री.रामचंद्र आंगणे, सानेगुरुजी कथामाला अध्यक्ष श्री.सुरेश ठाकुर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन श्री.गुरुनाथ ताम्हणकर यांना गौरवण्यात आले. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शिवराज सावंत, बँ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कट्टा सेवांगणचे अध्यक्ष किशोर शिरोडकर , श्रीम.शृंगारे मँडम, अरविंद शंकरदास, भाऊ मांजरेकर, बापू तळवडेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दीपक भोगटे यांनी पुरस्काराबाबत माहिती दिली. सेवांगणने गेली अनेक वर्षे शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतून नाथ पै यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य केले आहे, असे दीपक भोगटे म्हणाले. यावेळी सुरेश ठाकूर यांनी साने गुरुजी आणि नाथ पै यांच्या कार्याची ओळख करुन देताना शिक्षक हा सतत तेवणारा नंदादीप असतो. ज्ञानाचे कौशल्य विद्यार्थांबद्दलचे वात्सल्य आणि सामाजिक मांगल्याचं सर्वांगसुंदर दर्शन समाजाला होत असते, असे सांगितले. किशोर शिरोडकर यांनी बॅ. नाथ पै यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकून आज त्यांच्या विचार व वागणुकीची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.

साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून बॅ. नाथ पै सेवांगण मालवणच्या शिक्षण निधीचे कट्टा परिसरातील होतकरु विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. संजय रेंदाळकर लिखित “बॅ. नाथ पै – लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” या पुस्तकाचे प्रकाशन रामचंद्र आंगणे, सुरेश ठाकूर, किशोर शिरोडकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सेवांगण कट्टा येथे कार्यरत असलेले श्री. गोंधळी यांना राज्यस्तरीय लोककला संवर्धन पुरस्कार मिळाल्याबद्दल सेवांगणच्या वतीने त्यांचाही शाल व श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळकृष्ण नांदोसकर यांनी केले. आभार सौ. वैष्णवी लाड यांनी मानले. यावेळी ताम्हणकर सरांचे कुटुंबीय, श्री. अरुण भोगले, हेमंत हडकर, अविनाश नरे, माळगाव ग्रामस्थ व शिक्षकमित्र परशुराम गुरव, नवनाथ भोळे, रामचंद्र कुबल, सौ.शर्वरी सावंत, सौ.तेजल ताम्हणकर, सौ.रश्मी आंगणे, श्रीम.फाटक, सदानंद कांबळी, हृदयनाथ गावडे, विजय चौकेकर व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page