उडता न येणाऱ्या पक्ष्यावर उदय रोगे यांच्याकडून उपचार

⚡मालवण ता.१२-: सर्जेकोट येथील अजय वझे यांना त्यांच्या अंगणात आढळून आलेल्या खंड्या (किंगफिशर) या पक्ष्याला उडता येत नसल्याने त्यांनी याबाबतची माहिती पक्षीप्रेमी उदय रोगे यांना दिल्यावर रोगे यांनी या पक्ष्याला ताब्यात घेत त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. दोन दिवसांनी या पक्ष्यास उडणे शक्य झाल्यावर त्याला सोडून देण्यात येणार आहे, अशी माहिती उदय रोगे यांनी दिली.

सर्जेकोट येथील अजय वझे यांना सापडलेल्या या खंड्या पक्ष्याच्या पंखाच्या ठिकाणी जखम असल्याचे उदय रोगे यांच्या निदर्शनास आले. त्यादृष्टीने पक्ष्यावर काही आयुर्वेदिक उपचार रोगे यांनी सुरू केले आहेत. या उपचारानंतर दोन दिवसांनी या पक्ष्याला उडणे शक्य होईल असे उदय रोगे यांनी सांगितले. रोगे यांनी उपचार केलेला हा ५१० पक्षी ठरला आहे.

तर काही दिवसांपूर्वी मालवण रेवतळे येथील वालकर यांना सापडलेल्या सुर्यपक्ष्यावर (सनबर्ड) देखील रोगे यांनी उपचार केले होते. या पक्ष्याच्या पायांमध्ये समस्या निर्माण होऊन त्याला पाय लावणे कठीण बनले होते. या पक्ष्यावर रोगे यांनी उपचार करून त्याचे पाय व्यवस्थित झाल्यावर त्याला सोडून दिले. रोगे यांनी यापूर्वीही अनेक पक्ष्यांना जीवदान दिले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page