संजू परब;म्हाविकास आघाडीचे ५ उमेदवार निवडून येणार नसल्याचा केला दावा
⚡सावंतवाडी ता.१०-: आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीबाबत भाजपचे पूर्ण नियोजन झाले असून, महाविकास आघाडीचे ५ उमेदवार देखील निवडणूक येणार नाहीत. यावेळी देखील भाजपचीच सत्ता नगरपालिकेवर येणार असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
दरम्यान आमदार दीपक केसरकर व शिवसेनेला पराभूत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जोरदार कंबर कसली आहे. कोरोनाच्या काळात जीवाच्या भितीने केसरकर लपून बसले. मात्र आम्ही जिवाच्या आकांताने काम केले.त्यामुळे येथील जनता नक्कीच आमच्या पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री परब म्हणाले, याठिकाणी भाजपच्या माध्यमातून चांगले काम झाले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात सावंतवाडी बाजारपेठेत एकदाही पाणी आले नाही. यापूर्वी वारंवार पाणी व्यापाऱ्यांचे नुकसान होत होते. परंतु आता ही परिस्थिती राहिली नाही. कोरोना काळात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जीवावर उदार होऊन काम केले. मात्र आमदार दीपक केसरकर स्वतःच्या भीतीने लपून बसले. ही सावंतवाडीकर जनता जाणते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमच्या पाठीशी येथील नागरिक कायम राहतील. या ठिकाणी आमदार दीपक केसरकर विकास केल्याच्या वल्गना करत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे त्यांना अद्याप काम करणे जमलेले नाही. तर दुसरीकडे सावंतवाडीकरचे मुख्याधिकारी त्यांचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. सेल्फी पॉइंटचे काम अर्धवट आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा आमची भूमिका असेल. सावंतवाडी शहरात झालेल्या विविध विकास कामांबाबत आपण जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी यावर काहीच भाष्य केले नाही. साधी चौकशी सुद्धा करण्याचे त्यांनी धारिष्ट्य दाखवले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आमदार केसरकर यांचा दबाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या आठ दिवसात त्यांनी योग्य ती भूमिका न घेतल्यास आपण पुढील भूमिका स्पष्ट करू, असा इशारा परब यांनी यावेळी दिला.