श्रमदानातून केली रस्त्याची डागडूजी
सावंतवाडी : सहदेव राऊळ : मळेवाड मुख्य रस्ता ते देऊळवाडी या अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतिशेत असलेल्या रहदारीच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली होती. ही दुर्दशा पाहता मळेवाड येथील श्री कुलदेवता कला क्रिडा मंडळाच्या युवकांनी श्रमदानाने सिमेंट काँक्रीट टाकुन रस्त्यावर पडलेले खड्डे बूजवून रस्त्याची डागडूजी करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला. त्यांच्या या सामजिक कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच वाहनधारक व पादचाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.
वरची मळेवाड मुख्य रस्ता ते देऊळवाडी, कुंभारवाडी, जाधववाडी, भटवाडीपर्यंत जाणारा वर्दळीचा रस्ता असून श्री देव वेतोबा कुलदेवता मंदिराकडे येणाऱ्या भाविकांसाठी हा एकमेव मार्ग आहे. रस्ता दरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. २ ही अधिक पटसंख्या असलेली शाळा असून लहानलहान मुलांची याच रस्त्याने पाऊले चालतात. असे असताना या रस्त्याचे काम प्रशासनाच्या अनास्थेमुळे प्रतिक्षेत आहे. परिणामी रस्त्याची हानी होत प्रचंड दुर्दशा झाली. ही रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता येथे प्रवास करणे अधिकच कठीण बनले होते. पावसाळ्यात तर हा रस्ता अजुनही धोकादायक बनतो परिणामी अशा रख्यावरून शाळेतील लहान विद्यार्थी, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती यांना अडचण ठरणार होता.
सदर बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुरुस्तीची वाट न बघता मान्सुन पुर्वकाळात रस्त्यात्ती डागडूजी मंडळाच्या खर्चातून आणि श्रमदानातून करण्याचे ठरविले व अनेक ग्रामस्थांच्या सहकार्यातून अनेक दिवस श्रम करून रस्त्याच्या डागडुजीचे कार्य हाती घेतल आहे, तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पुलाचे किरकोळ दुरुस्तीचे काम मंडळ करणार असल्याचेही सांगण्यात आले.
रस्ता दरम्यान असलेले खेमराज पूल सुद्धा नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाने या पुलाच्या कामाकडे लक्ष द्यावा, अशी मागणीही मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पार्सेकर यांनी या कामासाठी खडी देऊन सहकार्य केले. सामाजिक बांधिलकीतून मंडळाने घेतलेल्या या उपक्रमात सहभागी सर्व युवकांचे मंडळाने अध्यक्ष सगुण जाधव यांनी कौतुक करत आभार मानले तर मंडळ यापुढे ही सामाजिक बांधिलकी सातत्याने जोपासत अनेक उपक्रम घेत राहतील’ असे मत मांडले. सल्लागार परेश नाईक, खजिनदार प्रवीण,मुळीक सुरज मुळीक, मुकुंद नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली हे रस्त्याचे काम करण्यात आले. यावेळी विशाल मुळीक, अक्षय नाईक, रामचंद्र नाईक, बबलू नाईक, कृष्णा माळकर सर्वेश मुळीक, जॅक्सन फर्नांडिस, नवनीत जाधव, गौरव गावडे, नेल्सन फर्नांडिस, नारायण नाईक, सागर मुळीक, विराज नाईक सुमन माळकर, विनित जाधव वेदांत घोगळे आदींसह अनेक ग्रामस्थांनी अमूल्य वेळ देऊन श्रमदान केले.