⚡कणकवली ता.१६-: ज्ञान कर्म भक्ति आणि मुक्ती संस्था यांच्यावतीने परम संतांच्या वाणीवर आधारित आध्यात्मिक सत्संग सोहळा व भंडाऱ्याचे आयोजन गुरुवार १९ व २० मार्च २०२६ रोजी माजगाव (ता. सावंतवाडी) येथील संस्थेच्या मठामध्ये करण्यात आले आहे.
या सत्संग सोहळ्यात संसारात राहून उत्तमरित्या परमार्थ कसा साधावा तसेच सहजरीत्या नामसाधनेद्वारे परमेश्वर प्राप्ती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परम संतांच्या वाणीमधून याबाबतचा सोपा आणि सरळ मार्ग भाविकांना ऐकायला मिळणार असल्याने भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून संतवचनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गुरुवार दि. १९ मार्च रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत भक्तिगीत व भजने होणार असून सकाळी ११ ते १२.३० या वेळेत संतवाणीवर प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ या वेळेत संतदर्शन व कृपाप्रसाद तर दुपारी १ ते २.३० या वेळेत महाप्रसाद होणार आहे.
शुक्रवार दि. २० मार्च रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत भक्तिगीत व भजने होणार असून सकाळी ११ ते १२.३० या वेळेत श्री संत सद्गुरु आनंदी गुरुजी यांच्या दिव्यवाणीतून परम संतांच्या वाणीवर आध्यात्मिक प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ या वेळेत संतदर्शन व कृपाप्रसाद तर दुपारी १ ते २.३० या वेळेत महाप्रसाद होणार आहे. सर्व सद्भक्तांनी संतदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ज्ञान कर्म भक्ति आणि मुक्ती संस्था, माजगाव (खोतवाडा), ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे होणार असून बाहेरगावाहून येणाऱ्या सद्भक्त साधकांच्या राहण्याची सोय हॉलवर करण्यात आली असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे.
