चालक जख्मी; मातीचा भराव वाहून गेल्याने घटला अपघात
⚡बांदा ता.०८-: बांदा-दाणोली रस्त्यावर वाफोली धरणानजीक डस्ट वाहतूक करणारा डम्पर रस्त्याच्या खाली कलांडून अपघातग्रस्त झाला. या अपघातात चालक जखमी झाला. याठिकाणी पुलाचे काम सुरु असून पावसात मातीचा भराव वाहून गेल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी ठेकेदाराला धारेवर धरले. अखेर मातीचा भराव तात्काळ काढण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, वाफोली धरणानजीक नळपाणी योजनेच्या शेजारी मुख्य रस्त्यावर पुलाचे काम सुरु आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ठेकेदाराने मातीचा भरावं टाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. आज पाऊस पडल्याने भरावाची सर्व माती रस्त्यावर आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे निसरडा बनला होता. बांद्यातून वाफोलीच्या दिशेने जाणारा डम्पर घसरल्याने रस्त्याच्या खाली कोसळला. यामध्ये चालक जखमी झाला. त्याला उपचारासाठी सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
. भर पावसात मातीचा भराव टाकण्यात आल्याने स्थानिक संतप्त झालेत. माजी उपसरपंच मंथन गवस, विनेश गवस यांच्यासह स्थानिकांनी ठेकेदाराला घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी तात्काळ भराव काढण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले.