मळगाव येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा;कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने आयोजन
सावंतवाडी ता.०७.सहदेव राऊळ-: शिवाजी महाराज हे पराक्रमाने व कर्तृत्वाने महान राजे होते. त्यांच्या विचारांचे आदानप्रदान आत्ताच्या पिढीने राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ यांनी मळगाव येथे केले.मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वाचन मंदिरच्या रमाकांत खानोलकर सभागृहात सोमवारी ‘शिवराज्याभिषेक दिन’ सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी राऊळ बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरचे नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत खानोलकर, निवृत्त कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ, उपाध्यक्ष रामचंद्र आईर, वाचनालयाचे संचालक पृथ्वीराज बांदेकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, वाचन प्रेमी, शिवप्रेमी, विद्यार्थी उपस्थित होते.
राऊळ पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी जुलमी मोघल साम्राज्याशी लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कुठल्याही धर्माची अवहेलना केली नाही. त्यांच्या सैन्यात मुसलमान सुद्धा होते. महाराजांनी फक्त जुलमी मुघलांशी लढा दिला. त्यांचे कर्तृत्व व पराक्रम महान होते. त्यांच्या विचारांचे आदानप्रदान आजच्या पिढीने राखले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी रेश्मा आनंद शिरोडकर, निधी चंद्रकांत राऊळ यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडे सादर केले. स्नेहा खानोलकर यांनी शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा इतिहास कथन केला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे गड किल्ले जपले निर्माण केले, ज्यांचा सांभाळ केला तेच गड किल्ले सह्याद्री प्रतिष्ठान संवर्धन करून सांभाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
यावेळी शेखर पाडगावकर यांनीही आपले विचार मांडले. नेमळे हायस्कूलची विद्यार्थिनी पूर्वा रामदास चांदोरकर हिने शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अभिनयस्वरूप भाषण करत मान्यवरांची वाहवा मिळवली. निधी राऊळ हिच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना पृथ्वीराज बांदेकर यांनी तर आभार गुरुनाथ नार्वेकर यांनी मानले. यावेळी कल्पवृक्ष शेतकरी गट, गुरुनाथ नार्वेकर, शेखर पाडगावकर यांनी सह्यद्री प्रतिष्ठान करत असलेल्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कामास आर्थिक मदत केली. या कार्यक्रमावेळी या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्यावरील वाचनालयात असलेल्या पुस्तकाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते, हे प्रदर्शन पुढे दोन दिवस वाचकांसाठी पाहण्यास उपलब्ध राहणार आहे. तसेच यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभागाने केलेल्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे फोटो स्वरूपात प्रदर्शन मांडण्यात आले होते. कार्यक्रमास वाचनालयाचे वाचक, हितचिंतक, शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्या नियोजनातून दर्जेदार झाला.
