तारकर्लीतील वीज पुरवठा सुरळीत करा; अन्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जा

सुरेश बापर्डेकर यांचा वीज वितरणला इशारा

मालवण ता.०२-:* पर्यटन गाव असलेल्या तारकर्ली मध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून आहे. विद्युत तारांना स्पर्श होणाऱ्या झाडी व फांद्या वाढलेल्या असून यामुळे स्पर्किंग होत आहे. विजेच्या खेळखंडोब्यामुळे ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत असून आठ दिवसात दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जा असा इशारा तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश बापर्डेकर यांनी वीज महावितरण मालवण कार्यालयास निवेदनाद्वारे दिला आहे.

उपकार्यकारी अभियंता,उपविभागीय कार्यालय महावितरण मालवण यांना सुरेश बापर्डेकर यांनी निवेदन देऊन तारकर्ली गावातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत लक्ष वेधले आहे. तारकर्ली गावात गेले कित्येक महिने विजेचा खेळ खंडोबा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मालवण महावितरण कार्यालयातील अधिकारी तारकर्ली गावावर जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. सततच्या वीज खंडित होण्याने कित्येकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त झालेली आहेत.

ग्राहकांचा हा भुर्दंड कोण भरून देणार ? गर्मीने नागरिक आणि पर्यटक हैराण होत असून पुढे पावसाळा येत आहे. त्यावेळी वीज पुरवठा खंडित होण्याची गणती करायलाही वेळ नसणार. त्यामुळे आत्ताच वीज पुरवठ्यात कुठे समस्या आहेत, त्याची पाहणी करून येत्या आठ दिवसात दुरुस्ती करावी, अशी मागणी बापर्डेकर यांनी केली आहे. तसेच काही विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत असल्याने देखील स्पार्किंग होऊन वीज पुरवठा खंडित होत आहे.

याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. महावितरणवर तारकर्ली वासीय मोठ्या प्रमाणात नाराज असून जर हा विजेचा खेळ खंडोबा थांबला नाही तर ग्रामस्थांच्या नाराजीचा उद्रेक होईल. याला सर्वस्वी महावितरण अधिकारी जबाबदार राहतील असेही सुरेश बापर्डेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page