टोलमध्ये घोळ कोणी केला? टोलमधून सिंधुदुर्ग जिल्हा वगळा
कणकवली ता.२८-:* मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्याबाबतच्या पहिल्या टेंडरमध्ये एम एच ०७ म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा वगळून टोल घ्या,असे आदेश होते. आता तो आदेश बदलला कसा? तसेच २ मे २०२२ रोजीचे टेंडर आदेश ८ लाख २२ हजार ९९९ दर दिवशी टार्गेट होते मग मग आता २५ मे २०२३रोजी ६ लाख ५३ हजार ८९४ रुपये टेंडर कसे झाले? याबाबत सिंधुदुर्ग वासियांमध्ये संभ्रम आहे. यामागे नेमका सूत्रधार कोण हे आम्ही निश्चितच सांगू मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला संपूर्ण टोल माफी मिळावी ही आमची आग्रही मागणी आहे असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने काढलेले टोलटेंडर रद्द करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते .यावेळी त्यांनी टोलबाबत सुरू असलेल्या वादाबाबत अनेक शंका उपस्थित करताना टोलमागे काहींचे छुपे हात आहेत असा आरोप केला.
समीर नलावडे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल बाबत बऱ्याच राजकीय लोकांनी मते मांडली.जनतेच्या टोलबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला टोल भरायला लागता कामा नये.यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. महामार्ग विभागाकडून या टोलच्या टेंडरबद्दल ५० टक्के कागद मिळवले आहेत.ओसरगाव येथील टोल वसुली टेंडर दोन वेगवेगळ्या रक्कमेची कशी?त्यामागे कोणाचा हात?असा सवाल करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी झालीच पाहिजे असे सांगताना नलावडे म्हणाले,ओसरगाव टेंडरमध्ये काही अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे.
हे मी जबाबदारीने बोलतो,२ मे २२ रोजी टेंडर आदेश ८ लाख २२ हजार ९९९ दर दिवशी टार्गेट आहे.त्याला दिलेली वर्क ऑर्डर आहे. मात्र २५ मे २२ रोजी ६ लाख ५३ हजार ८९४ रुपये कसे झाले?त्याच अधिकाऱ्यांची सही आहे.पहिल्या टेंडर मध्ये एम एच ०७ वगळून टोल घ्या,असे आदेश होते. आता तो आदेश बदलला कसा?त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.याबद्दल केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे व आ.नितेश राणे यांना हे बोगस टेंडर प्रक्रियेचे पेपर पाठवणार आहे.कोणत्याही परिस्थितीत हे टेंडर रद्द झालेच पाहिजे,अशी आमची मागणी असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.
ओसरगाव टोल वसुली हे टेंडर एम एच ०७ वगळून होते,आता पुन्हा दोन रक्कमचे कसे झाले?याबाबत केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांना नाम.राणे भेटणार आहेत.हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे.जे कोण यात असतील त्यावर कारवाई झाली पाहिजे.कणकवली, देवगड ,वैभववाडी या तीन तालुक्यातील लोकांचे नुकसान होणार आहे.पहिल्या टेंडरमध्ये बदल कोणी केला?कोणी भूमिका मांडली त्यांनी हे टेंडर रद्द करण्यासाठी पुढे या,टोल बाबत आम्हाला राजकारण करायचे नाही.या सर्वांनी एकत्र लढू आणि जिल्ह्यातील जनतेला दिलासा देऊ असे आवाहन समीर नलावडे यांनी केलं.
टोल तुम्ही घेणार असाल तर टॉयलेट झालं का?गर्डर आद्यपही कणकवलीत ठेवले आहेत.कारण या पुलाचा भाग कोसळू शकतो,हे त्यांना माहीत आहे.हायवे कायदा सांगतो,७० टक्के काम असेल तर ७० टक्के टोलचे पैसे घेतले पाहिजेत. टोल १०० टक्के घेऊ नये.याबाबत ८-१० दिवसांत सर्व कागदपत्रे मिळतील,आपण सर्वांसमोर जाहीर करु, असा इशारा समीर नलावडे यांनी दिला.
टोल वसुलीसाठी ५० कर्मचारी नेमले आहेत त्यातील फक्त १३ कर्मचारी स्थानिक आहेत.ओसरगावमध्ये टोल असेल तर स्थानिकांना घ्या.५० कर्मचारी स्थानिक असलेच पाहिजेत,अशी मागणी सर्व पक्षीय लोकांनी केली पाहिजे,असे आवाहन समीर नलावडे यांनी केले.तसेच सातारा व अन्य ठिकाणी ज्याप्रकारे त्या त्या जिल्ह्याला सूट देण्यात आली आहे तशाच प्रकारची सूट सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही देण्यात यावी ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.
