माजी नगरसेवक सुरेश भोगटेनी वेधले नगरपालिकेचे लक्ष; परिसर करून घेतला स्वच्छ..
सावंतवाडी ता.२७-:* सावंतवाडी शहरात एस टी स्टँड च्या मागील परिसरात असणाऱ्या सुलभ शौचाल्यात पाण्याचा योग्य वापर केला जात नसल्याने शौचालय तसेच आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे आक्रमक झाले असून, त्यांनी आज पालिका कर्मचाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पाहणी केली आहे.
यावेळी तेथील नागरिकांनी हे शौचालय वापरण्यासाठी पैसे घेतले जातात परंतु, स्वच्छता केली जात नाही. असा आरोप केला आहे. याबाबत सुरेश भोगटे यांनी नगरपरिषदेच्या आरोग्य अभियंता नाडकर्णी यांना याबाबतची माहिती देताच त्यानी आज नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी पाठवले होते. यावेळी सुरेश भोगटे यांनी स्वतः उपस्थित राहत तो परिसर स्वच्छ करून घेतला. यावेळी ते म्हणाले की, यापुढे या ठिकाणी दुर्गंधी पसरू नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे.
