सावंतवाडी ता.०७-:* उद्यापासून सुरू होणाऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनाची सुरुवात आज सायंकाळी शोभायात्रेने शानदार पणे करण्यात आली. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व मिरवणूकीने करण्यात आली असून यामध्ये विविध चित्ररथ यांचा समावेश होता. महापुरुषांचे प्रतिबिंब चित्ररूपाने अवतरण यात आले होते. तसेच आजरा येथील वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने भजनात तल्लीन होऊन ग्रंथ दिंडीत सहभाग घेतला. ग्रंथ दिंडीत तीन चित्ररथ त्यांचा समावेश करण्यात आला होता. यात बडी इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असा संदेश देणारा बळीराजा वर आधारित प्रथम चित्र साकारण्यात आला.
दुसऱ्या चित्ररथात स्त्री मुक्तीचा संदेश देणारा देखावा साकारण्यात आला तर अंतिम चित्ररथ हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आधारलेला होता. वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भजन गायनाने मिरवणुकीत रंगत आणली. सावंतवाडी शहरातील आरपीडी शाळेच्या भव्य पटांगणात उद्यापासून सुरु होणा-या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाची आज पासून सुरुवात झाली आहे. दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले असून प्रसिद्ध लेखिका व पत्रकार संध्या नरे पवार या संमेलनाच्या अध्यक्षा असून प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत.
शनिवारी सायंकाळी गोवा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील विविध संस्कृतीवर आधारीत आकर्षक चित्ररथ शोभायात्रेत साकारण्यात आला असून या सोहळ्याची सुरुवात डॉ.बाबासाहेब आबेडकर स्मारक तथा समता प्रेरणाभूमी येथून ही शोभायात्रा वाजतगाजत गुरुवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरी ( आरपीडी हायस्कूल) अशी ही भव्य शोभायात्रा विविध चित्ररथांसह काढण्यात आली. उद्या रविवार दि.८ मे रोजी सकाळी ११ वाजता या संमेलनाचे उद्घाटन नागराज मंजुळे याच्या हस्ते होणार आहे.
