*⚡वेंगुर्ला ता.०६-:* वेंगुर्ला शाळा परबवाडा नं.१चा मागील दोन वर्षांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कोविडमुळे घेता आला नव्हता. त्यामुळे दोन वर्षांचा एकत्रित कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरपंच विष्णू परब, उपसरपंच हेमंत गावडे, पालक व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, एस.टी.एस, ब्रेनडेव्हलपमेंट, गणित संबोध यांसारख्या शाळाबाह्य स्पर्धा परीक्षेतील गुणवत्ताधारक, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हापरिषद सिंधुदूर्गने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेते, विविध मंडळाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी, शालेय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व शाळेचे विशेष मानकरी अशाप्रकारे १५० बक्षिसांचे रोख व वस्तू स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर डॉ.संजीव लिंगवत, प्रा.पी.जी.देसाई, माजी सभापती सारीका काळसेकर, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनिल परब, पौर्णिमा नाईक, हर्षाली गवंडे, कांता देसाई उपस्थित होते.
मुख्याध्यापक रॉड्रीग्ज यांनी अहवाल वाचन व आपल्या मनोगतामध्ये शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम व शाळेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा ऊहापोह केला. सरपंच विष्णू परब यांनी मागील वर्षी शाळेच्या सांस्कृतिक सभागृहाच्या नूतनीकरणसाठी, यावर्षी शाळेच्या खिडक्यांना स्लायडींग व रंगरंगोटी, माजी शिक्षण सभापती दादा कुबल यांच्या मार्फत १० लाखाचा निधी, तसेच ग्रामपंचायतील मार्फत स्मार्ट टि.व्ही, फिल्टर दिल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व संपूर्ण टिमचे आभार मानले व यापुढे असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा रॉड्रीग्ज यांनी व्यक्त केली.
डॉ. लिंगवत यांनी मुलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यास मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले. प्रा.देसाई यांनी अपयश हीच यशाची पहिली आहे. अपयशाने खचून न जाता भरपूर वाचन करा,वाचन केल्याने आपल्या शब्द संपत्तीमध्ये वाढ होत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक विशाल जाधव, सुत्रसंचालन रामचंद्र झोरे व आभार मिलिंद सरोवदे यांनी मानले.
