पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळेच “त्या” स्टॉल धारकांना स्टॉल हटविण्याच्या नोटिसा…

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा आरोप…

मालवण दि प्रतिनिधी मालवण बंदर जेटी येथे गेली कित्येक वर्ष स्थानिक लोक हंगामी स्वरूपात स्टॉल उभारून छोटा मोठा व्यवसाय करत आहेत. मात्र, या व्यावसायिकांना बंदर विभागाने स्टॉल हटावच्या ज्या नोटिसा बजावल्या आहेत त्याला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. सुदेश आचरेकर यांनी करून या स्टॉल धारकांवर कारवाई करू नये याबाबत भाजप नेते निलेश राणे हे या स्टॉल धारकांच्या पाठीशी आहेत. बंदर जेटीवरील हे स्टॉल कोणत्याही परिस्थितीत हटवू देणार नाही असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला. तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री. अशोक सावंत यांनी महाविकास आघाडी सरकार आल्यानंतरच बंदर जेटी वरील स्टॉल धारकांना स्टॉल हटवण्याच्या नोटिसा येतातच कशा असा सवाल उपस्थित केला. मालवण बंदर जेटी येथील ५६ स्टॉल धारकांना बंदर विभागाने स्टॉल हटवण्याच्या नोटिसा बजावल्या. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्टॉल हटविण्यात यावे अशा प्रकारचा अल्टीमेट बंदर विभागाने दिला होता. या नोटिसा बजावण्यात आल्यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून स्थानिकांचे स्टॉल हटवू नये असे बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले होते.

हे स्टॉल हटवण्याची नोटीस बजावल्याने मालवण भाजपने मालवण बंदर विभागाचे बंदर निरीक्षक श्री. अमोल ताम्हणकर यांची भेट घेतली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने श्री. ताम्हणकर यांची भेट घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप शहर अध्यक्ष दिपक पाटकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेविका पूजा सरकारे, विजय केनवडेकर, ललित चव्हाण आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सुदेश आचरेकर यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण दौऱ्यात मालवण बंदर जेटीवर भेट दिल्यानंतर इथल्या स्थानिक पर्यटन व्यावसायिक स्टॉल धारकांना नोटिसा धाडल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकार इथल्या गोरगरीब स्टॉल धारकांवर स्टॉल हटविण्याची नोटिसा पाठवून एकप्रकारे अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी श्री. अशोक सावंत यांनीही स्टॉल धारकांना बंदर विभागाने ज्या नोटिसा पाठविल्या आहेत त्याला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे. राज्यात सत्ताधाऱ्यां व्यतिरिक्त सुरुवातीला स्टॉल धारकांना नोटिसा पाठवायच्या आणि मग त्या नोटिसा आम्ही थांबविल्या असे सांगत श्रेय घ्यायचे असा घाट घातला जात आहे राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे पालकमंत्री त्यांचाच आहे आमदार खासदारही महाविकास आघाडीचा आहे आणि असे असताना या नोटिसा येतातच कशा असा सवाल श्री. सावंत यानी विचारला. यावेळी मालवण बंदर जेटीवरील स्टॉल धारकांच्या पाठीशी भाजप असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

You cannot copy content of this page