माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी आमनेसामने यावे
*💫बांदा दि.१४-:* शिवसेनेने नेहमीच लोकहिताचा विचार करून इन्सुलीत विकासकामे केली आहेत. इन्सुलीतील जनता पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. विकासासाठी जनता शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या बाजूने राहतील, असा विश्वास माजी पं. स. सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी कृष्णा सावंत, साई राणे, सदा राणे, काका चराटकर, नाना पेडणेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर हे केवळ बोलबच्चन असून त्यांनी आपल्या कार्यकाळात काय विकासकामे केली यासाठी आमने सामने यावे असे आव्हान केले. ग्रामपंचायत ही ठेकेदारीचे कुरण आहे असा आरोप करणाऱ्या सभापती मानसी धुरी यांच्या वक्तव्याचा कडक समाचार घेताना सभापती सौ धुरी यांच्या पतीनेच गावात ठेकेदारी पद्धत सुरू केल्याचा टोला राणे यांनी यावेळी लगावला. इन्सुली गावात रस्ते, वीज, पाणी यासाठी आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून कामे करण्यात आली आहेत. भाजपा पदाधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने देण्याचीच कामे केली आहेत. स्थानिक जनता आता भूलथापांना बळी पडणार नसून या निवडणुकीत जनताच त्यांचा खोटेपणाचा बुरखा फाडणार आहे. शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या सर्वच्या सर्व ११ जागा निवडून येणार असल्याचा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
