सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांचा इशारा; त्या झाडांची तोड करणाऱ्यांवर आठ दिवसात कारवाईची मागणी
वेंगुर्ला प्रतिनिधी- वायंगणी-पोयंडेवाडी येथील समुद्रकिना-यावर सामाजिक वनीकरण विभागामार्फत शासनाचा ३ लाख ५० हजार रुपये निधी खर्च करून लागवड करण्यात आलेल्या झाडांची तोड करणा-यावर आठ दिवसात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल न झाल्यास महाराष्ट्र दिनी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिका-यांना दिला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी-पोयंडेवाडी येथील समुद्रकिना-यावर सामाजिक वनिकरण विभागाने शासनाचा ३ लाख ५० हजार रुपये निधी खर्च करून लागवड केलेल्या सुरूच्या झाडांची सामाजिक वनीकरण विभाग अथवा वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर तोड करण्यात आलेली आहे.
ही बाब पर्यावरणास हानीकारक असून याबाबत सामाजिक वनीकरण विभाग वेंगुर्ला यांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सामाजिक वनीकरण विभाग वेंगुर्ला यांनी पोयंडेवाडी येथे जागेवर जाऊन पंच यादी घातलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावून समुद्रापर्यंतचा भाग मोकळा करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणावर देखील परिणाम होणार असल्याने याबाबत सामाजिक वनीकरण विभाग वेंगुर्ला कार्यालय येथे कळून देखील अद्यापपर्यंत संबंधितावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही.
सागरी किनारा यांच्या संरक्षणासाठी सुविचा रुक्ष पट्टा तयार करणे या योजनेखाली सन २०१८/१९ मध्ये वायंगणी पोयंडेवाडी येथील समुद्रकिना-यावर १.५० हेक्टर क्षेत्रावर ३७५० सुरूच्या झाडांची लागवड करण्यात आलेली असून त्या झाडांना पाणी देणे खत देणे व कुंपण करणे आधी बाबींवर शासनाचा ३ लाख ५० हजार रुपयांचा निधी खर्च झालेला असून शासनाच्या नियमानुसार या झाडांची विल्हेवाट करणा-यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. संबंधित विभागाकडून वायंगणी-पोयंडेवाडी येथील सुरूच्या झाडांची विनापरवाना बेकायदेशीर विल्हेवाट करणा-यावर आठ दिवसात कारवाई न झाल्यास महाराष्ट्र दिनी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून शासनाचे लक्ष वेधावे लागतील. तरी संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी केली आहे.
