चार दिवसात त्या दोषींवर कारवाई न केल्यास 24 एप्रिल ला पूर्वकल्पना न देता करणार आत्मदहन…

मनसे उपतालुकाध्यक्ष उदय गावडे यांचा इशारा

मालवण ता.१९-:* साळेल येथे अस्तित्वात नसलेली शेततळी दाखवून लाखो रुपयांची रक्कम संगनमताने हडप केल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी पाच वर्षे तक्रार अर्ज करून आणि दोन वेळा उपोषण करून तसेच कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश देऊनही आजपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने येत्या चार दिवसात याप्रकरणी कारवाई झाली नाही तर २४ एप्रिल नंतर कुठलीही पूर्वपरवानगी न देता जिल्हा परिषद आवारात कधीही आत्मदहन करू, असा इशारा साळेलचे माजी सरपंच आणि मनसेचे उपतालुकाध्यक्ष उदय गावडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबतचे निवेदन उदय गावडे यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा मुख्य अभियंता यांना दिले आहे. या निवेदनात श्री गावडे यांनी म्हटले आहे की, साळेल येथील जंगलात असलेल्या विहिरीला शेततळी दाखवून ८ लाख ६७ हजार ८०० रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत गेली पाच वर्षे आपण सर्व पुरावे सादर करत उपोषणे केली. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर करूनही दोषींवर कारवाई झालेली नाही. तसेच कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे येत्या चार दिवसात कारवाई झाली नाही तर २४ एप्रिल नंतर कुठलीही परवानगी न देता जि. प. आवारात कधीही आत्मदहन करू, जिवंतपणी आम्हाला न्याय मिळणार नाही, अशी आमची खात्री झालेली असून निदान मेल्यावर तरी न्याय मिळावा, असे उदय गावडे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page