घरात काहीच न सापडल्याने प्रयत्न फसला; मात्र परिसरात भितीचे वातावरण
मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील गोठणे गावातील दोघा मुंबईस्थित चाकरमान्यांची बंद असलेली घरे अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री लक्ष्य करीत ही दोन्ही घरांच्या दरवाजाची कडी कोयंडे धारदार हत्याराने तोडून घरात प्रवेश करीत चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने अज्ञात चोरट्याच्या हाती काहीच हाती न लागल्याने संबंधितांचे मोठे नुकसान टळले आहे. मात्र या घरफोडीच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान , याबाबत आचरे पोलिसांनी रात्रोच्यावेळी गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे मिळालेल्या माहितीनुसार गोठणे वड येथील अनिरुद्ध जठार व गोठणे माळ येथील अमित नारकर हे कामानिमित्त आपल्या कुटुंबासमवेत मुंबईत राहत असल्याने या दोंघाचीही गोठणे येथील घरे ही बंद असतात रविवारी रात्री या दोन्ही घरांच्या दरवाजाचे कडी कुलूप धारदार हत्यारांनी तोडून अज्ञात चोरट्यानी प्रवेश केला. चोरट्यानी घरातील कपाटे फोडून कपडे व इतर साहित्य काढून अत्यवस्थ स्थितीत टाकले. मात्र पैसे किंवा दागिने त्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे रिकाम्या हातीच चोरट्यांना पळ काढावा लागला. सकाळी जठार यांच्या घरा समोर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना जठार यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने जठार हे मुंबईहून गावी आले असावेत या विचाराने विक्रेत्यांनी घराच्या ठिकाणी बघितले असता जठार हे गावी आले नसल्याचे त्यांना समजले. जठार यांच्या घराप्रमाणे नारकर यांच्या घराचाही दरवाजा उघडा दिसून आल्याने चोरट्यानी घरफोडी केल्याची ग्रामस्थांची खात्री पटली. याबाबत आचरा पोलीसाना माहिती देण्यात आली असून याबाबत आचरा पोलीस अधिक तपास करत आहेत.