सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण…

संजय लाड: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण…

⚡सावंतवाडी ता.०३ अक्षय धुरी-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली आहे. जिल्ह्याला भेडसावणाऱ्या गंभीर वीज समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतचे निवेदन दिले असल्याची माहिती यावेळी जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी यावेळी दिली.

वीज ग्राहकांचे मागील तीन वर्षांपासून हाल
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या ३ लाख ५९ हजार २२३ वीज ग्राहक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील वीज समस्यांबाबत संघटनेने अनेकवेळा निवेदने दिली आहेत. यापूर्वी २६ जानेवारी २०२४ रोजी अधीक्षक अभियंता, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण देखील करण्यात आले होते, मात्र तरीही वीज ग्राहकांच्या समस्या ‘इंचभरही’ कमी झालेल्या नाहीत.

महावितरण अधिकाऱ्यांच्या कारभारावर गंभीर आरोप
संघटनेने महावितरणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्यावर चुकीच्या व निष्क्रिय कारभाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील वीज ग्राहकांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. हजारो ग्राहकांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवूनही महावितरणने अद्याप कोणाचेही समाधान केले नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.

गणेश चतुर्थी तोंडावर असतानाही जिल्ह्याला अंधार
आगामी २७ ऑगस्ट २०२५ रोजी कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीच्या तोंडावरही महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनी आणि विद्युत प्रणालीची देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत केलेली नाहीत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधील सुमारे साडेआठ लाख नागरिकांना वारंवार अंधारात राहावे लागत आहे. विशेषतः १९ मे २०२५ रोजी अवकाळी पाऊस पडल्यानंतर सिंधुदुर्गातील जनता अक्षरशः आठ ते दहा दिवस सातत्याने काळोखात होती, याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.

उच्चस्तरीय भेटीगाठी निष्फळ
संघटनेने यापूर्वी सीएमडी महावितरण, मुंबई; मुख्य अभियंता, रत्नागिरी; तसेच केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री मा.ना. श्रीपादजी नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही वीज ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.

या गंभीर परिस्थितीत, वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि महावितरणला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजीचे लाक्षणिक उपोषण हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

You cannot copy content of this page