विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होताच करिअरच्या अनेक संधी : प्रा. सेन

मालवण ता.०६-:* ‘विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. त्या जाणून घेऊन आपली आवड कशात आहे, याचा विचार करून मार्गक्रमण करा, तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन प्रा. प्रतीक्षा सेन यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे ‘विज्ञान विषयातून पदवीनंतर करिअरच्या संधी’ या विषयावर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आभासी परिसंवादात पुणे येथील प्रा. प्रतीक्षा सेन या बोलत होत्या. या सत्रात २२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी प्रा. सेन यांनी विस्ताराने मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत? त्यांना कसे सामोरे जावे, याबाबत प्रा. सेन यांनी विवेचन केले. बायो केमेस्ट्री, बायो टेक्नॉलॉजी, मायक्रो बायोलॉजी आदी विषयक अभ्यासक्रम व शिकण्याची पद्धत कशी असावी, याविषयी त्यांनी काही संदर्भांसह माहिती दिली. सेट, नेट, गेट परीक्षा, पीचएडी हे परवलीचे शब्द झाले असले तरी त्या संदर्भातील बारकावे प्रा. सेन यांनी समजावून सांगितले. विज्ञान शाखेतून पुढे जात असताना अनेक संधी मिळतात. मात्र, आपले ध्येय नक्की हवे. सोबत चिकाटी आणि परिश्रमाची तयारी हवी’, असेही प्रा. सेन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. या परिसंवादात कॉलेजच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला सामंत, प्रा. डॉ. उर्मीला मेस्त्री, प्रा. संकेत बेळेकर, प्रा. पाटकर, प्रा. निकिता राऊळ, प्रा. रश्मी राऊळ, प्रा. सौदागर, प्रा. बिड्ये, लायब्ररीयन पवार यांचाही सहभाग होता.

You cannot copy content of this page