*💫मालवण दि.१०-:* मालवण चिवला बीच येथील समुद्रात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणार्या एका पर्यटकास स्थानिक तरूणांनी वाचविल्याची घटना काल सायंकाळी उशिरा घडली. याची माहिती मालवण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित पर्यटक व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या पर्यटकाला आज पोलिस ठाणे येथे आलेल्या संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, समुद्रात उडी मारून जीव देणार्या पर्यटकाचा जीव वाचविणार्या स्थानिक तरूणांचा पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबाबत मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवणात पर्यटनासाठी आलेली सदर व्यक्ती चिवला बीच येथील समुद्रात दुपारी दोन वाजल्यापासून उतरली होती. सायंकाळच्या वेळेस या व्यक्तीने पुन्हा समुद्रात उडी घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार स्थानिक पर्यटन व्यावसायिक सचिन गोवेकर, महादेव वेंगुर्लेकर, गुरू वेंगुर्लेकर, हेमंत सारंग, दाजी जोगी यांच्या लक्षात येताच त्यांनी समुद्रात धाव घेत त्या पर्यटकाला समुद्रातून बाहेर काढत किनार्यावर आणले. या प्रकाराची माहिती त्यांनी मालवण पोलिस ठाण्यास दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर, गृहरक्षक दल जवान परशुराम आंगचेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. चिवला बीच समुद्रात जीव देण्याचा प्रयत्न करणार्या पर्यटकाचा जीव वाचविणार्या स्थानिक तरूणांचा पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. ओटवणेकर म्हणाले, पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाचा जीव वाचविण्याचे मोठे काम स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी केले आहे. एखाद्या पर्यटकावर आपत्कालीन परिस्थिती ओढविल्यास स्थानिक पर्यटन व्यावसायिकांकडून असे कार्य घडणे हे पोलिस अधीक्षकांनाही अपेक्षित आहे. संबंधित पर्यटकाचा जीव वाचविण्याचे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय असून यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांबद्दलची चांगली भावना राज्यभरातून येणार्या पर्यटकांपर्यत पोहचली आहे. यापुढेही स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी आपत्कालीन परिस्थितीत असेच सहकार्य द्यावे, अशी अपेक्षा श्री. ओटवणेकर यांनी व्यक्त केली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक भारत फार्णे, पी. जी. मोरे, सिद्धेश चिपकर आदी उपस्थित होते.
चिवला समुद्रात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकाला स्थानिकांनी वाचविले
