वेंगुर्ला ता.२२-:* शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) सिधुदुर्ग, गटसाधन केंद्र वेंगुर्ला यांच्यातर्फे स्टार्स प्रकल्प अंतर्गत परबवाडा शाळा नं.१मध्ये आयोजित केलेल्या शाळा पूर्व तयारी अभियान तालुकास्तर प्रशिक्षणाचे उद्घाटन परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या हस्ते व गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
नविन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणा-या मुलांची शाळापूर्व तयारी होण्याच्यादृष्टीने ही प्रशिक्षण घेण्यात आले. प्रत्येक कार्यबल गटातील दोन तज्ज्ञ शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. आगामी काळात हा उपक्रम तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणार आहे.
या उपक्रमा अंतर्गत मुले व पालक यांचे मार्च अखेर एक व जूनच्या सुरूवातीला एक असे दोन मेळावे शाळास्तरावर घेण्यात येणार आहेत. पहिल्या मेळाव्यात मुले पहिलीत दाखल होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये मूलभूत क्षमता किती विकसित आहेत याची नोंद कृतींच्या मदतीने घेतली जाणार आहे. ज्या मुलांना मूलभूत क्षमता आवश्यक असलेल्या कृती करताना मदतीची गरज लागते त्या मुलांच्या पालकांना शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून समुपदेशन करणार आहेत. तसेच दुस-या मेळाव्या पर्यंतच्या कालावधीत पालकांच्या भेटी घेऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.
परबवाडा येथील प्रशिक्षणवेळी उपस्थित शिक्षकांनी प्रभातफेरी तसेच प्रभमोपचार पेटी, समुपदेशन, शारिरीक विकास, बौद्धिक विकास व सामाजिक आणि भावनात्मक विकास आदी विषयांवरील स्टॉल मांडून या उपक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी वंदना परब, शाळा परबवाडा नं.१ चे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब, केंद्रप्रमुख भागोजी अडूळकर, महादेव आव्हाड, तज्ज्ञ मार्गदर्शक मिलींद टिळवे, गीता ठाकूर, विषयतज्ज्ञ शिवानी आळवे यांच्यासह अंगणवाडी सेविका व सहकारी उपस्थित होते.
