रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी
*💫सावंतवाडी दि.०८-:* मळगाव-वेत्ये मार्गावर तेलकाटावाडी परिसरातील रस्ता मायनिंगच्या डंपर वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाला आहे. यामुळे या रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालविताना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता असल्याने संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी तेलकाटावाडी ग्रामस्थ तसेच वाहन धारकांमधून होत आहे. मळगाव-वेत्ये मार्गावरून मोठ्या प्रमाणात मायनिंग वाहतूक होत असते. नोव्हेंबरपासून ही मायनिंग सुरू होऊन ती जूनपर्यंत सुरूच असते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे पावसाळ्यात तर या रस्त्यावरून वाहन धारकांना वाहने चालविताना अधिकच त्रास होत आहे. यावर्षी मायनिंग सुरू होण्या अगोदर तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र ही केलेली मलमपट्टी मायनिंग वाहतूक सुरू झाल्यावर काही दिवसातच उखडून रस्त्यावर लहान खड्डे पडायला सुरुवात झाली. काही दिवसांनी लहान खड्ड्यांचे परिवर्तन मोठ्या खड्ड्यात होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मळगाव-वेत्ये हा मार्ग झाराप-पत्रादेवी बायपासला मिळत असल्याने जवळचा मार्ग म्हणून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. डंपर चालकांकडून या मार्गावरून बेशिस्तपणे डंपर चालविले जात आहेत. खड्डे असतानाही सुसाट डंपर चालविले जात असल्याने तेथून जाणाºया वाहन धारकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावी लागत आहेत. त्यामुळे येथे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या मायनिंग वाहतुकीमुळे रस्त्यावर तसेच रस्ता परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच चालणेही मुश्कील बनले आहे. याचा विचार करून संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची डागडूजी करावी, अशी मागणी होत आहे.
