सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी ता.११-:* कोरोनाच्या भीतीतून विद्यार्थ्यांना मनमोकळा आनंद देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने मर्कझी जमात बॉम्बे संचलित येथील सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी या शाळेने अनोखा उपक्रम राबविला. यात नृत्य, समूह नृत्य, देशभक्तीपर नृत्य, एकपात्री प्रयोग अशा विविधांगी कार्यक्रमांचा समावेश होता. प्रशालेतील १८० विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विशेष म्हणजे कोरोना नियम शिथिल असतानाही कोरोना नियमांचे पालन करत हा उपक्रम राबविला. ऑनलाइन (लाईव्ह) मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे पालकांच्या सहकार्याने ११ मार्चला सकाळी ९ ते १२ या वेळेत करण्यात आले. जवळपास ६२ कार्यक्रमांचे दोन दिवसांमध्ये नियोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिजिटल शिक्षण देणारी पहिली शाळा म्हणून ओळख असणाऱ्या सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी या शाळेने ऑनलाईन (लाईव्ह) सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याने सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालक वर्गाने विशेष सहकार्य केले. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, पालक शिक्षक कार्यकारणी समिती, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
