कणकवलीकराणी साक्षात अनुभवला बहिणाबाईंच्या कवितांचा अक्षर नजराणा

जळगाव परिवर्तन संस्थेच्या महोत्सवाचे कवी अजय कांडर यांच्या हस्ते उदघाटन

कणकवली ता.२६-: बहिणाबाई म्हणजे मराठी कवितेचे विद्यापीठ. त्यांच्या कवितेचा अक्षर नजराणा साक्षात कणकवलीकरानी येथे अनुभवला आणि बहिणाबाईंचे तावडी बोलीतील अक्षर वैभव आपलेसे करत इथला रसिक वर्गही बहिणाबाईमय झाला! निमित्त होते ते प्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी उद्घघटन केलेल्या आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जळगावच्या परिवर्तन संस्थेच्या ‘अरे संसार संसार’ या बहिणाबाईंच्या काव्य-गीत कार्यक्रमाचे! जळगाव परिवर्तन संस्थेचा तीन दिवसाचा नाट्य-कला महोत्सव वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानने येथील आपल्या नाट्यगृहात आयोजित केला असून त्याचे उद्घघाटन कवी कांडर यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलतांना कांडर यांनी कोकणचा सांस्कृतिक केंद्र म्हणून वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान जवळ बघितले जाते आणि खानदेशचे सांस्कृतिक केंद्र म्हणून परिवर्तन संस्थेला मानले जाते. या दोघांच्या सहयोगातून येथे परिवर्तन नाट्य-कला महोत्सव आयोजित केला गेला ही अनुकरणीय अशी गोष्ट आहे. सांस्कृतिक क्षेत्रात संस्थात्मक कामांचे असे आदान-प्रदान होत राहिले पाहिजे. आणि याचा प्रारंभ वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान आणि परिवर्तन संस्थेने या महोत्सवाच्या माध्यमातून केला याबद्दल या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे आग्रहाने सांगितले. यावेळी परिवर्तन संस्थेचे प्रमुख ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, उपाध्यक्ष मंजुषा भिडे, अभिनेत्री श्रीमती पाटील, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, कार्याध्यक्ष ऍड नारायण देसाई, कार्यवाह शरद सावंत, राजा राजाध्यक्ष, लीना काळसेकर आधी उपस्थित होते.

महोत्सवाच्या उदघाटन सत्रा नंतर महोत्सवाच्या पहिला दिवशी बहिणाबाईंच्या कवितांच्या अप्रतिम सादरीकरणाचा ‘अरे संसार संसार’ कार्यक्रम झाला. बहिणाबाईंची कविता म्हणजे साक्षात जगण्याचं तत्वज्ञान. माणसाच्या दुःखाचा पीळ त्यांच्या कवितेमधून जसा घट्ट होत गेला तसाच स्त्रीच्या पारंपारिक जगण्याच्या वेदनेचा झराही अधिकाअधिक गहिरा होत गेला. असा सघन आशय बहिणाबाईंच्या कवितेमधील तोलून धरणारे सादरीकरण या कार्यक्रमात परिवर्तन संस्थेच्या कलावंतांनी केले आणि एकामागोमाग एक सादर होणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उस्फुर्त दादही मिळविली.

बहिणाबाईंची कविता ही अहिराणी बोलीतील, असा समज सर्वत्र झालेला आहे. मात्र या समजला या कार्यक्रमातून सुनियोजित असा तडा दिला गेला. बहिणाबाईंची कविता ही अहिराणी भाषेतील नसून तीची निर्मिती तावडी बोली, लेवा पाटील बोली अशा विविध बोली भाषेच्या शब्द सामर्थ्यातून झाली असल्याचाही अनुभव उपस्थितांनी घेतला. ओघवत अर्थवाही, भाववाही सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी करून बहिणाबाईंच्या कवितेतील भाषासामर्थ पूर्णपणे तोलून धरले. आणि यातूनच बहिणाबाईंची कविता ही तावडी बोलीतील असल्याचे स्पष्टही झाले. तावडी बोलीतील कवितांचे निवेदन तावडी बोलीतूनच करताना बहिणाबाईंच्या जगण्याचाही घटनाक्रम सांगून बहिणाबाईंचे संपूर्ण जीवन चरित्र श्री पाटील यांनी या कार्यक्रमात उलगडून दाखविले. कवितेचं गाणं फारस या कार्यक्रमात होऊ दिले नसल्यामुळे आणि कार्यक्रमाला सुयोग्य संगीत साथ लाभल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उपस्थित रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असा सादर झाला!

यावेळी वामन पंडित, मंजुषा भिडे यांनी विचार व्यक्त केले. शरद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सर्व स्तरातील रसिक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होता.

You cannot copy content of this page