अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा हाती घेणार असल्याचा राजू शेटकर यांचा इशारा; अधिकाऱ्यांना दिले निवेदन
बांदा ता.१८-:* मडुरा-पाडलोस सीमेवर सुरू असलेल्या कालव्यावरील पुलाचे काम पूर्ण होऊन एक वर्ष उलटले तरीही रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अपघात टाळण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. येत्या पंधरा दिवसांत सदर ठिकाणी डांबरीकरण न झाल्यास ग्रामस्थ आणि वाहनचालकांना घेऊन आंदोलनात्मक पवित्रा हाती घेणार असल्याचा इशारा, शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना लेखी दिला आहे. यावेळी मळेवाड युवासेना विभाग प्रमुख समीर नाईक उपस्थित होते. मडुरा रेल्वे स्टेशनजवळ बांदा शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे कालव्याच्या कामासाठी सुस्थितीत असलेला चांगला रस्ता उखडण्यात आला. सदर पुलाचे काम होऊन तब्बल एक वर्षांचा कालावधी उलटला तरीही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. शाळेतील विद्यार्थी तसेच अन्य प्रवासी याच मार्गावरून प्रवास करत असताना अपघात घडण्याची शक्यता आहे. आठ दिवसांपूर्वी याच पुलावर एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला असून प्रशासन मात्र झोपी गेले आहे. सदर ठिकाणी खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी वजा गरज असताना अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात असा सवाल श्री. शेटकर यांनी केला. कालव्याच्या पुलावरील रस्त्याची दुरूस्ती येत्या पंधरा दिवसांत न केल्यास मडुरा दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, प्रवासी व वाहनचालकांना घेऊन याच ठिकाणी आंदाेलन छेडण्यात येईल असा इशारा उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी दिला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असे लेखी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
