*वाळू टेंडर भरण्याचा मालवण बैठकीत एकमुखी निर्णय*
*💫मालवण दि.०४-:* शासनाने वाळूचे दर वाढविल्याच्या कारणास्तव वाळू टेंडर भरणार नसल्याचा इशारा देणाऱ्या वाळू व्यवसायिकांनी प्रशासनाला दिलेली डेड लाईन संपून गेल्याने आणि सर्वसामान्यांशी निगडित असणाऱ्या या प्रश्नावर सत्ताधारी लक्ष देत नसल्याने बॅकफूटवर येत वाळू टेंडर भरण्याचा निर्णय घेतला आहे आज याबाबत जिल्हा वाळू व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष बाबा परब यांनी मालवणात वाळू व्यवसायिकांची बैठक घेत वाळू व्यवसाय चालू रहावा तसेच जनतेला वाळू उपलब्ध व्हावी यासाठी वाळू टेंडर भरण्याचा एकमुखी निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, वाळूचे दर कमी करण्या बाबत पाठपुरावा करूनही सत्ताधारी लोकप्रतिनिधी व शासन यांच्याकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याचे सांगत याबाबत ११ जानेवारी पर्यंतची मुदत आम्ही देणार असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे असेही बाबा परब आणि काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . मालवण येथील हॉटेल सिल्व्हर सँड येथे जिल्हा वाळू व्यवसायिक संघटनेची बैठक संपन्न झाली. त्यानंतर आयोजित जिल्हा वाळू व्यावसायिक संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष बाबा परब आणि काका कुडाळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यावेळी बाबा परब म्हणाले शासनाने वाळूचे दर वाढविल्याच्या कारणावरून संघटनेने कोणीही वाळू टेंडर भरू नये असा निर्णय घेतला होता. या आवाहनाला वाळू व्यवसायिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. मात्र यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या. जनतेची घर बांधणी तसेच शासकीय बांधकामे ही वाळू उपलब्ध न झाल्याने थांबली आहेत. जनतेला वाळू उपलब्ध व्हावी तसेच व्यवसाय सुरू रहावा यासाठी आज झालेल्या सभेत वाळू टेंडर भरण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे . वाळू दर कमी करण्याबाबत शासनाला दहा दिवसांची मुदत दिली होती. याबाबत सत्ताधारी लोकप्रतिनिधी, आमदार खासदार व पालकमंत्री यांचेही लक्ष वेधले. मात्र वाळू दर कमी झाले नाहीत, असेही परब म्हणाले. यावेळी काका कुडाळकर म्हणाले, वाळूचा दर, पासची मुदत व किती होड्या वाळू काढावी याचा ताळमेळ बसत नाही. या जाचक अटी आम्हाला मान्य नाहीत . वाळू उपसा होत नसल्याने सर्वसामान्य जनतेला वाळू उपलब्ध होत नाही. लोकांना कमी दराने वाळू मिळावी शासनाने वाढविलेल्या दरानुसार वाळू काढली गेल्यास ती बाजारात जनतेला महाग दरात मिळेल. त्यामुळे दर कमी होणे गरजेचे आहे. तसेच व्यवसाय न करता वाळू व्यवसायिक किती दिवस थांबणार आहेत ? वाळू व्यवसायिकांवर डंपर संघटना, कामगार वर्ग व इतर घटक अवलंबून असून आमच्या लढ्याचा विपरीत परिणाम जनतेवर तसेच डंपर व्यवसायिकांवर व शासकीय कामांवर होणार आहे. व्यवसाय सुरू व्हावा व लोकांना वाळू मिळावी यासाठी आम्ही वाळू टेंडर भरण्याचा निर्णय घेतला आहे, असे काका कुडाळकर म्हणाले. वाळू दर कमी होण्याबाबत शासनाची निर्णय प्रक्रिया होईपर्यंत थांबण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. तरी वाळूचे दर कमी करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही ११ जानेवारी पर्यंतची आणखी मुदत शासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींना देत आहोत. अन्यथा शासनाने वाढविलेल्या दरानुसारच वाळू टेंडर भरून व्यवसाय सुरू करणार असून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत, असे कुडाळकर व परब यांनी सांगितले.
