*⚡मालवण ता.११-:* बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्व विचार व कृती पार पाडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी केले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात गुणवत्ता वाढ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी शिक्षण अधिक गुणवत्ता पूर्ण कसे करता येईल, ह्या उद्देशाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी डॉ. सुभाष देव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अध्यापन अध्ययन प्रक्रिया, प्रशासकीय कामकाज आणि संस्था व्यवस्थापन गुणवत्ता वाढीसाठी काय काय प्रयत्न करता येतील याबाबत डॉ. देव यांनी उपस्थितांशी तीन सत्रांमध्ये संवाद साधला. यावेळी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सदस्य डॉ. सुमेधा नाईक यांनी कार्यशाळेचे संचालन केले तसेच आभार मानले.
