ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले आकाशातील ग्रह-तारे

*⚡मालवण ता.०३-:* कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या प्रशालेच्या मैदानामध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी मालवण येथील खगोल तज्ज्ञ मंदार माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे आकाश दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रह – तारे दुर्बिणीद्वारे अनुभवता आले. तसेच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ होण्यास मदत झाली. मालवणमधील खगोलशास्त्राचे अभ्यासक मंदार माईणकर यांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांना दुर्बिणीद्वारे अवकाशातील ग्रह व तारे, आकाशगंगा, धूमकेतू आणि इतर खगोलांबद्दल शास्त्रीय माहिती दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी प्रत्यक्ष संवादाद्वारे अवकाशातील ग्रहताऱ्यां विषयीच्या शंका-कुशंकांचे निरसन केले.

त्यानंतर प्रत्यक्ष दुर्बिणीद्वारे आकाशातील ग्रह-ताऱ्यांचे दर्शन घडवून आणले. शनि, गुरु, देवयानी दीर्घिका, काही तारकासमुह,नेब्युला हे प्रत्यक्ष दुर्बिणीद्वारे पाहता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आकाशातील अनेक ग्रहताऱ्यांची ओळख होऊन ध्रुव तार्‍याच्या स्थानावरुन दिशा कशा ओळखायच्या, कृष्णविवर, नवीन तार्‍यांचा जन्म याबद्दल शास्त्रीय माहिती मिळाली. ओझर विद्यामंदिरमध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओझर विद्यामंदिरचे उपक्रमशील शिक्षक प्रवीण पारकर यांनी मेहनत घेतली. तर पालकांचेही सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गानेही आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशालेच्या वतीने अनेक नवनवीन उपक्रम राबवत असल्याबद्दल पंचक्रोशीतील पालकांनी समाधान व्यक्त केले. प्रशालेच्या संस्थेच्या आणि पालकांच्या सहकार्यामुळे असे उपक्रम राबविणे शक्य होत असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page