तारकर्लीत पर्यटनाच्या नावाखाली बेकायदेशीर धंदे

स्नेहा केरकर यांचा आरोप;मालवण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु

मालवण (प्रतिनिधी) पर्यटन गाव असलेल्या तारकर्ली मध्ये पर्यटनाच्या नावाखाली अनेक बेकायदशीर व्यवसाय सुरू असून यावर महसूल प्रशासन, मेरिटाईम बोर्ड, बंदर विभाग व पोलीस यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. यामुळे नाहक तारकर्ली ग्रामपंचायत व सरपंच यांची बदनामी होत असून तालुका प्रशासन तुपाशी असे म्हणत तारकर्लीच्या सरपंच सौ. स्नेहा केरकर यांनी तालुका प्रशासनाच्या निषेधार्थ मालवण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे.

या गैर व्यवसायांवर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा इशारा केरकर यांनी दिला आहे. तारकर्ली गावात समुद्र किनाऱ्यावर रोजगार व पर्यटनाच्या नावाखाली स्थानिक धनदांडगे व परप्रांतीय व्यक्तींकडून तालुका प्रशासनाच्या मुख्य कार्यालयांच्या सहकार्याने अनेक विनापरवाना व बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. जल क्रीडा, उपहारगृहे, आदी विनापरवाना सुरू असून मालवण तहसील कार्यालय, मालवण पोलीस ठाणे आणि तारकर्ली एमटीडीसी यांच्या वरदहस्ताने राजरोस अनधिकृत व अनैतिक धंद्यांचे पेव तारकर्लीत वाढले आहे. उंट व घोडेवाले परप्रांतीय व्यक्ती आपले कामगार व परिवारासह तारकर्लीत राहत असून घोडे उंट यांच्या मलमूत्र विसर्जन उघड्यावरच होत असून यामुळे फंगसचा रोग गावात पसरत आहे. समुद्र किनाऱ्यावर रोजगाराच्या नावाखाली झोपडपट्टी सदृश्य चित्र निर्माण झाले असून तारकर्ली बंदर जेटीवर मासे विकणाऱ्या महिलांसाठी असलेली पत्र्याची शेड अतिक्रमण हटाव मोहिमेत हटविण्यात आली. मात्र, समुद्र किनारा व जेटीवर होणाऱ्या इतर प्रकारच्या अतिक्रमणा बाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विनापरवाना होणाऱ्या साहसी जल क्रीडांवर बंदर विभाग कारवाई का करत नाही. तालुका प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याने तारकर्लीतील परिस्थितीसाठी ग्रामपंचायत व सदस्य यांच्याकडे बोट दाखविले जात आहे. मात्र, यामध्ये ग्रामपंचायत व सरपंच यांची नाहक बदनामी होत असून तालुका प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ आपण आमरण उपोषण झेडले असल्याचे सरपंच सौ. केरकर यांनी सांगितले. तारकर्लीतील अनधिकृत व्यवसायांवर व अतिक्रमणावर तालुका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सौ. केरकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page