*डॉ. संजय सावंत : जिवंत मासे विक्री वाहन ‘मत्स्यकन्या’ चे उदघाटन
*💫मालवण दि.२८-:* कोकणातील लोक समुद्रातील मासे खाण्यास जास्त पसंती देतात. परंतु गोड्या पाण्यातील मत्स्यपालन व विक्री व्यवसायाकडे जास्त वळत नाहीत. मात्र मत्स्य पालन व मत्स्य शेती द्वारे तयार केलेल्या मासे खायला येणारे भरपूर जण असून हे मासे जिवंत अवस्थेत ग्राहकांना विकणे ही अभिनव गोष्ट आहे. आज ग्राहकांना ताजे मासे मिळत नसताना थेट जिवंत मासा ग्राहकांना पोहचविण्याचा निलक्रांती संस्थेचा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले. कोकणातील मत्स्य शेतकरी, मच्छीमार यांना त्यांच्या मत्स्य उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी नीलक्रांती संस्थेने कोकणात पहिल्यांदाच सुरू केलेल्या जिवंत मासे विक्री वाहन ‘मत्स्यकन्या’चे सोमवारी सायंकाळी नीलक्रांती संस्थेच्या कोळंब येथील केंद्रावर कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य विद्या शाखेचे अधिष्ठाता डाॅ. प्रकाश शिनगारे, जिल्हा बँक संचालक श्री.अतुल काळसेकर, डॉ. इंदुमती सावंत, मत्स्य कार्यालयाच्या अधिकारी तेजस्विता करंगुटकर, श्री. भालेकर,, मत्स्यतंत्र पदविका विद्यालय शिरगांव, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ.मंगेश शिरधनकर, मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे मत्स्य शास्त्रज्ञ डॉ.नितीन सावंत, नीलक्रांती मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर, डॉ. विवेक रेडकर, कोळंब सरपंच सौ. प्रतिमा भोजने, नगरसेविका पूजा करलकर, नगरसेवक व भाजपचे शहराध्यक्ष दीपक पाटकर आदी उपस्थित होते. यावेळी अतुल काळसेकर यांनी ज्याप्रमाणे जिल्ह्यात आंबा व काजू पिकाची क्रांती होऊन आर्थिक उन्नती झाली तसेच मत्स्य शेतीतून देखील जिल्ह्यात मत्स्य क्रांती घडवून येईल व येथील तरुणांना मत्स्य शेती व विक्री द्वारे चांगले उत्पन्न मिळू शकेल असे सांगितले. नीलक्रांति संस्थेच्या जिवंत मासे विक्री वाहन मत्स्यकन्या उपक्रमा मुळे मत्स्य व्यवसायाला एक नवी दिशा मिळणार असल्याचे रविकिरण तोरसकर यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, डॉ. नितीन सावंत, डॉ. शिनगारे, मत्स्य अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनीही मार्गदर्शन करत निलक्रांती संस्थेच्या जिवंत मासे विक्री उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मत्स्य शेती करणाऱ्या मत्स्य शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सिद्धांत उपसकर यांनी तर आभार रविकिरण तोरसकर यांनी मानले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, विलास हडकर, श्वेता पाटील, सचिन नाईक, राजेश कोपकर, महेश मांजरेकर, पूजा सरकारे, आदी तसेच संस्था सदस्य, मत्स्य शेतकरी व इतर उपस्थित होते.
