Headlines

सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाची शाळा भरली…

आनंद शिशुवाटिकेच्या चिमुकल्यांनी टाळ-घोषात साकारली आषाढी एकादशीची दिंडी..

⚡सावंतवाडी, ता. २१-: सावंतवाडीतील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरात आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आनंद शिशुवाटिका (बालवाडी) येथील चिमुकल्यांनी पारंपरिक दिंडी काढून भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-घोष आणि विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या आनंद शिशुवाटिकेतील विद्यार्थ्यांनी हा उपक्रम साकारला. आनंद शिशुवाटिका ही उपक्रमशील व संस्कारक्षम शाळा असून लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये अनौपचारिक शिक्षणासोबत सांस्कृतिक व धार्मिक मूल्यांची जपणूक करण्यावर भर दिला जातो. त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले.

विठ्ठल नामाच्या गजरात आणि वारकरी परंपरेतील अभंगांच्या स्वरांत चिमुकल्यांनी मंदिर परिसर दुमदुमून सोडला. “सांग विठुराया कधी येसील भेटायला, चिमुकली दिंडी माझी निघाली भेटायला…” अशा भक्तिमय गीतांवर विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

यावेळी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, शिक्षिका प्राजक्ता वेगुर्लेकर, सुचिता वाघ, वीमा परब, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग तसेच विठ्ठल मंदिर समितीचे स्थानिक सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
चिमुकल्यांच्या या निरागस दिंडीमुळे विठ्ठल-रुक्माई मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला असून उपस्थित वारकरी व भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

You cannot copy content of this page