वायरी- तारकर्ली रस्त्यावरील खड्ड्यात बसून आमरण उपोषण छेडणार – सुरेश बापर्डेकर

*💫मालवण दि.२७-:* वायरी ते तारकर्ली रस्त्याच्या रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी आमरण उपोषण आंदोलन छेडल्यावर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी देऊनही अद्याप काम सुरू न झाल्याने चुकीचे आश्वासन देऊन दिशाभूल केल्याचा आरोप सुरेश बापर्डेकर यांनी केला आहे. तारकर्ली रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार असल्याचे सांगत बांधकाम विभागाच्या निषेधार्थ दि. २९ डिसेंबर रोजी तारकर्ली रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा बापर्डेकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सुरेश बापर्डेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयाला सादर केले आहे. केळबाई मंदिर ते तारकर्ली रस्ता रुंदीकरणासह हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची मागणी वारंवार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारे कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ बापर्डेकर यांनी दि. १ डिसेंबर रोजी आमरण उपोषण छेडले. त्यावेळी बांधकाम अभियंत्यांनी दहा दिवसांत खड्डे भरण्याचे काम सुरू केले जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे बापर्डेकर यांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले होते. मात्र त्या पुढील दहा दिवसांत किंवा त्यानंतर आजपर्यंत तारकर्ली रस्त्याबाबत कोणतेही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे बांधकाम विभाग जनतेची चेष्टा करत असून जाणीवपूर्वक रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका बापर्डेकर यांनी केली आहे. बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ आपण तारकर्लीच्या रस्त्यावरील खड्ड्यात बसून आमरण उपोषण करणार आहोत, पुढे जे काय घडेल त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता व कार्यालय जबाबदार राहील, असा इशारा सुरेश बापर्डेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page