३६ तास राबविण्यात आली सागरी सुरक्षा मोहीम;घुसखोरी करू पाहणाऱ्या रेट टीमला ब्ल्यू टीमने रोखले
मालवण दि प्रतिनिधी सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिसांच्या व सागरी सुरक्षा यंत्रणा यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सागर कवच मोहिमेत सिंधुदुर्ग पोलिसांची सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेले ३६ तास पोलीस आणि सागरी सुरक्षा यांनी राबविलेल्या सागरी सुरक्षा मोहिमेत पोलिसांच्या ब्लु टीमने सर्जेकोट बंदरातून घुसखोरी करू पाहणाऱ्या रेड टीमला जेरबंद करीत सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे सिद्ध करून दाखविले यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, बुधवार १ डिसेंबर सकाळी ६ वाजता सागर कवच अभियान सुरू झाले.
बंदोबस्ताच्या अनुषंगाने मालवण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना रात्री मालवण पोलिसांच्या ब्लु टीमला सर्जेकोट बंदरात सुमारे एक किलोमीटर अंतरावर एक संशयित बोट असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार मालवण पोलिसांची ब्लु टीम पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यासह हेमंत पेडणेकर, सुहास पांचाळ, कैलास ढोले, दिलीप खोत, अजय येरम, देवानंद लुडबे, विश्वास पाटील ही टीम तात्काळ सर्जेकोट बंदर येथे पोहचली. बंदरावरीलच एका खाजगी होडीने पोलीसानी हत्यारबंद स्टाफ सह सर्जेकोट बंदरात शोध मोहीम राबवली. यावेळी जेटी पासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर शीतल नाव असलेली बोट दिसून आली.
बोटीवरील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यामुळे बोटीवरील व्यक्तींची खातरजमा करत असता ते लपून बसले होते. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी संपूर्ण बोटीची झडती घेऊन काही संशयास्पद आहे का याचा शोध घेतला. त्यानंतर बोटीवरील सर्व व्यक्तींना ताब्यात घेऊन पडताळणी करता प्रथम त्यांनी काही माहिती दिली नाही. परंतु सखोल चौकशी करता त्यांनी आपली ओळख सांगून ते सागर कवच बंदोबस्तातील रेड टीम चे कर्मचारी आहेत असे सांगितले. त्यांच्याकडील ओळखपत्राची खात्री केली असता त्यामध्ये ३ पोलीस अंमलदार, १ कोस्ट गार्ड कर्मचारी, १ नेवी कर्मचारी तसेच तांडेल व ५ खलाशी असे मिळून आले. रेड टीमने रत्नागिरी येथून प्रथम देवगड येथे आल्याबाबत सांगितले व देवगड पोलिसांनी त्यांना पकडले. ओळख पटल्यावर सोडून दिले. त्यानंतर ही रेड टीम मालवण किनारपट्टी वर पोहचली मात्र येथेही ब्लु टीमने पकडले. रेड टीम कर्मचारी यांना पुढील ऑपरेशन कामी जाण्याचे असल्याने मालवण ब्लु टीमने त्यांना सोडून दिले. एकूणच ३६ तास सुरू असलेल्या सागर कवच मोहिमेची गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सांगता झाली.
