कणकवली तालुका प्रवासी संघाने सभेत मांडल्या भावना
कणकवली ता.३०-: एसटी कर्मचार्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारला असून आता शासनानेही त्या लढ्यास न्याय देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एसटी कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांनीही आता तुटेल एवढे न ताणता आपली व प्रवाशांची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा तालुका प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली.
कणकवली तालुका प्रवासी संघ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच येथील ज्येष्ठ नागरीक विरुंगळा केंद्र येथे पार पडली. याप्रसंगी अध्यक्ष मनोहर पालयेकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव सौ. श्रद्धा कदम, सीताराम उर्फ दादा कुडतरकर, रविंद्र मुसळे, राजाराम परब, पिलाजी कांबळे, सूर्यकांत राणे, सुरेश पाटकर आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एसटी कर्मचारी खर्या अर्थाने जनतेचे सेवक आहेत. गेले काही दिवस सुरु असलेल्या संपामुळे प्रवासी जनतेचीही गैरसोय होत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रिदवाक्याचा अर्थ लक्षात घेऊन कोकणातील ग्रामीण भागातील प्रवासी जनतेची गैरसोय कर्मचार्यांनी दूर करावी. त्यांच्या लढ्याला प्रवासी जनतेचे आशिर्वादही निश्चित मिळतील, अशी अपेक्षा यावेळी करण्यात आली. सभेत विविध ठरावही संमत करण्यात आले. महामार्गावरील निवारा शेडनजीक तसेच मुतार्या तसेच कणकवली शहरात आठवडा बाजारादिवशी फिरत्या शौचालयांची सोय उपलब्ध करावी, अशी मागणी करण्याचे ठरविण्यात आले.
डिसेंबर महिन्यात रोटरी क्लब व ज्येष्ठ नागरीक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्याचे ठरविण्यात आले. ग्रामिण रुग्णालयातील आवश्यक पण, बंद असलेल्या मशिनरी सुरु करून त्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध व्हावेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे प्रवासामध्ये सवलत मिळावी. एसटीने महामंडळानेही ज्येष्ठ नागरीक व प्रवासी जनतेच्या गैरसोयीकडे लक्ष द्यावे, असे सुचविण्यात आले. गेल्या काही वर्षांत तालुका प्रवासी संघाने राबविलेले उपक्रम स्तुत्य असून भविष्यात राबविण्यात येणार्या उपक्रमांचा आढावा वाढविण्यासाठी क्रियाशील सभासदांची गरज आहे. कणकवली तालुक्यातील सामाजिक बांधिलकीने काम करू इच्छिणार्या कार्यकर्त्यांनी संघाचे सभासद व्हावे. अधिक माहितीसाठी (9421235589) येथे संपर्क करण्याचे आवाहन पालयेकर यांनी केले. या सभेत सुरुवातीला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रवासी संघाचे माजी उपाध्यक्ष वाय. पी. राणे, माजी खजिनदार मारूती जाधव, सभासद विजय गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
