*⚡वेंगुर्ला ता.२९-:* भारतीय हवामान खात्याने कोकण विभागात पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे आंब्यावर तुडतुडे, फुलकिडी, भुरी व करपा तसेच काजूमध्ये ढेकण्या फुलकिडी व करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी आंबा व काजू बागायतदारांनी वेळोवेळी पिकांचे सर्वेक्षण करुन काळजी घ्यावी असे आवाहन वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातर्फे केले आहे. मोहरलेल्या बागांमध्ये मोहोर गळून पडण्याचे प्रमाण वाढले आहेत. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास पालवीवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी पावलीवर डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ९ मिली तर मोहोर व फळधारणा अवस्थेसाठी इमिडाक्लोप्रिड ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून अतिरिक्त फवारणी करावी. त्या ठिकाणी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे त्याठिकाणी फुलकिडींचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून नियंत्रणासाठी पालवी अवस्थेसाठी डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली प्रति १० लिटर तर फळधारणेच्या अवस्थेसाठी स्पिनोसॅड ४५ एस.एल. २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुरी रोगासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मिली किवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर व करपा रोगासाठी कार्बेडॅझीम १२ टक्के सोबत मॅन्कोझेब ६३ टक्के १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. काजूची पालवी किवा मोहोर काळपट आढळल्यास विद्यापिठाने केलेल्या शिफारशीनुसार लॅम्डा सायहॅलोथ्रिन ६ मिली किवा प्रोफेनोफॉस १० मिली किवा अॅसिडामिप्रिड ५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून यापैकी एका किटकनाशकांची फवारणी करावी. फुलकिडीचे नियंत्रण करताना ढेकण्यासाठी वापरले जाणारे किटकनाशक चालते. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईट २० ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १० मिलि किवा अॅसिटामिप्रिड ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून यांची मिश्र फवारणी करावी. पावसाची तीन ते चार तासांची उघडीप दिसून आल्यास फवारणी करावी व त्या फवारणी स्टीकरचा वापर करावा. जेणेकरुन पावसामुळे किटकनाशकांची मात्रा वाया जाणार नाही. शेतक-यांनी सदर उपाययोजनांचा अवलंब करुन आपल्या आंबा व काजू बागांचे संरक्षण करावे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत सहयोगी संशोधन संचालक डॉ.बळवंत सावंत, किटकशास्त्र विभागाचे डॉ.विजयकुमार देसाई व डॉ.गोपाळ गोळवणकर यांनी केले आहे.
अवकाळी पावसापासून आंबा, काजूच्या रक्षणासाठी उपाययोजना
