*⚡मालवण ता.२९-:* जेलिफिश आणि केंड माशामुळे मच्छीमारांना होत असलेला त्रास आणि त्यामुळे जाळ्यांचे होणारे नुकसान याची पाहणी मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख यांनी थेट समुद्रकिनारी येऊन करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमार अन्वय प्रभू यांनी केली आहे. महापूर तसेच अवकाळी पावसानंतर केंद्र व राज्यातील विविध मंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतात. त्याचप्रमाणे जेलिफिशमुळे पारंपरिक रापण व गिलनेटधारक मच्छीमारांचे होत असलेले हाल मत्स्यविकास मंत्र्यांनी पाहण्याची गरज आहे. जेलिफिश आणि केंड माशांमुळे जाळ्यांचे मोठे नुकसान होते. केंड मासा जाळी कुडतरून टाकतो. तर जेलिफिशमुळे जाळी कमकुवत होतात. परंतु अशा प्रकारच्या जाळी नुकसानभरपाईसाठी शासनदरबारी कोणतीही तरतूद नाही. शिवाय परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे जे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान होते त्याची भरपाई देण्याचीही कोणतीही तरतूद नाहीय. तरी मत्स्य विकासमंत्र्यांनी याबाबत, थेट मच्छीमारांशी संवाद साधून माहिती घ्यावी आणि पारंपरिक मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.
जेलिफिश व केंड माशामुळे होणाऱ्या नुकसानीची मत्स्य मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी – अन्वय प्रभू
