*रेवडी ग्रामपंचायतीची मालवण तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी*
मालवण दि -: खालची रेवंडी येथील खाडी आणि समुद्राच्या पाण्यापासून जमिनीची धूप रोखण्यासाठी मालवणच्या पतन विभागाने काही वर्षांपूर्वी बांधलेला धूप प्रतिबंधक बंधारा जे सी बीच्या साहाय्याने तोडून तसेच त्याठिकाणच्या कांदळवन वृक्षाची बेसुमार तोड करणाऱ्या सुदेश दत्तात्रय कांबळी आणि रसिक कुऱ्हाडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा आशयाची मागणी रेवंडी ग्रामपंचायतीने मालवणचे तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे. खालची रेवंडी येथील खाडी किनारी असलेला धूप प्रतिबंधक संरक्षक बंधारा सुदेश दत्तात्रय कांबळी आणि रसिक कुऱ्हाडे या दोन व्यक्तींनी पतन विभाग व ग्रामपंचायतीला कोणतीही कल्पना न देता तोडला असून तेथील कांदळवनातील झाडेही तोडली आहेत , अशी तक्रार रेवंडी ग्रामपंचायतीने मालवण तहसीलदारांकडे केली आहे. यापूर्वीही २७ ऑक्टोबर रोजी प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्या दोन व्यक्तींनी कोणतीही पूर्व कल्पना न देता परवानगी शिवाय जेसीबीच्या साहाय्याने हा बंधारा तोडला असून तेथील कांदळवनाची झाडेही तोडली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या जागेची पाहणी करण्यात यावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रेवंडी ग्रामपंचायतीतर्फे सरपंच व ग्रामसेवक यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
