कणकवली येथील दोघा महिलांकडून वेंगुर्ला शहरातील व्यावसायिकाची सुमारे 10 लक्ष रुपयांची फसवणूक…

⚡वेंगुर्ला ता.०२-: कणकवली येथील दोघा महिलांकडून वेंगुर्ला शहरातील एका तरुण व्यावसायिक युवकाची 9 लाख 90 हजार रुपये आर्थिक फसवणूकीची घटना घडली आहे. ही घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता ते 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वा.या मुदतीत वेंगुर्ला शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये घडली आहे. याबाबत संबंधित युवा व्यावसायिकाने वेंगुर्ला पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. त्याने वेंगुर्ला पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवार 2 मार्च रोजी संबंधित दोन्ही महिलाविरोधात
बीएनएस कलम- 318 (4), 3(5) अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत वेंगुर्ला पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील दोन महिलांनी (वय सु. 30 व वय सु. 36 ) वेंगुर्ला येथे एका प्रसिद्ध हॉटेल मध्ये येऊन संबंधित व्यावसायिक यांना www.stake.com या गेमिंग ॲप्लिकेशन बाबत माहिती देऊन पैसे गुंतवल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल, असे आमीष दाखवून त्याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून त्या ॲप साठी एका महिलेने दिलेल्या YES बँक शाखा डोंबिवली – ईस्ट, खाते क्रमांक 095426900000384, IFSC code YESB0000954, यावर 9 लाख 90 हजार रुपये रक्कम RTGS द्वारे भरण्यास सांगून ते घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर हे अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरविली आहेत. मागील कालावधीत रेडी येथील युवकाची अशीच मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. दरम्यान वेंगुर्ला तालुक्यात वारंवार अशा घटना घडत असून तरुणवर्ग झटपट पैसा मीळविण्याच्या व वाढविण्याच्या नादात नुकसानग्रस्त होत आहे, त्यामुळे एकच प्रश्नचिन्ह व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी वेळीच सावध होऊन अशा महिला भामट्यापासून सावध व्हावे, असे मत व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page