सागर सुरक्षा रक्षक व राज स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यांमुळे वाचला बेळगाव येथील दोन पर्यटकांचा जीव…

शिरोडा समुद्र किनाऱ्यावरील घटना

*⚡वेंगुर्ले ता.२०-:* तालुक्यातील शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या बेळगाव येथील दोन पर्यटकांना काल सायंकाळी आपला जीव धोक्यात घालून नव्याने नियुक्त झालेला सागर सुरक्षारक्षक संजय नार्वेकर आणि राज स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यांनी वाचविले. दिवसेंदिवस पर्यटक या किनाऱ्यावर वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी आणखी दोन सागर सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांनी केली आहे. कोरोना महामारी चे संकट कमी झाल्याने पर्यटकांची गर्दी शिरोडा समुद्रकिनार्‍यावर वाढू लागली आहे. काल १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी किनार्‍यावर पर्यटकांची गर्दी होती. त्यातील काही पर्यटक आंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. पाण्यात उतरलेल्या पर्यटकांपैकी बेळगाव येथील गणेश बेळगणी आणि सागर वाली या दोन पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. ते पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच सागर सुरक्षा रक्षक संजय नार्वेकर याने आपल्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उतरले. त्यावेळी राज स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यांनाही त्याला साथ करीत त्या दोनही पर्यटकांचा जीव वाचवून सुखरूप पणे त्यांना पाण्याबाहेर काढले. शिरोडा किनाऱ्यावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना मनमोहक समुद्राकडे पहिल्यानंतर पाण्यात उतरून आंघोळ करण्याचा मोह आवरता येत नाही. परंतु काही पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा लाटांमुळे अंदाज येत नसल्याने ते पुढे पुढे जाऊन पाण्यात वाहतात व बुडतात. गेल्या महिन्याभरात चार ते पाच वेळा अशा बुडणाऱ्या पर्यटकांना राज स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या जिवाची पर्वा न करता वाचविले आहे. या किनाऱ्यावर सुरज अमरे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मात्र कमी मानधन आणि शासनाकडून लाईफ इन्शुरन्स नसल्यामुळे त्यांनी काम सोडल. त्यानंतर किनाऱ्यावर एकही सुरक्षा रक्षक नव्हता. या किनाऱ्यावर अनेक वर्षे राज स्पोर्ट च्या कर्मचाऱ्यांनी समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविले आहे. आणि अजूनही वाचवित आहेत. दरम्यान किनाऱ्यावरील ही गंभीर बाब लक्षात घेता चार दिवसांपूर्वी संजय नार्वेकर यांची प्रशासनाने सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान येथील वाढती पर्यटकांची संख्या लक्षात घेता येथे आणखी दोन सुरक्षा रक्षकांची आवशकता आहे, त्यांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page