मालवणच्या सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आणि दीपोत्सव साजरा…

मालवण (प्रतिनिधी) मालवण देऊळवाडा येथील मालवणचे ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेली श्री देव रामेश्वर – श्री देव नारायण यांची पालखी मिरवणूक व सुमारे ८ हजार कागदी कोनांच्या माळांची आरास आणि २ हजार पणत्यांची आरास करण्यात आली. आजकाल विविध उत्सवात प्लास्टिक फुले व इतर प्लास्टिक सजावट साधनांद्वारे आरास केली जात असताना देऊळवाडा येथील युवाईने पर्यवरणाचा संदेश देत केलेली कागदी कोनांची माळ व फुलांची आरास सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सातेरी देवी मंदिरातील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवानिमित्त या परिसरातील युवतींनी गेले महिनाभर मेहनत घेत रंगीत कागदापासून सुमारे ८ हजार कागदी कोन बनवले. यात २० ते २५ तरुणी सहभागी झाल्या होत्या. या कागदी कोनांच्या माळा बनवून त्यांची आरास सातेरी देवी मंदिराच्या मार्गावर आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. तर मंदिर प्रवेशद्वारावर कागदी फुलांची आकर्षक स्वागत कमान तयार करण्यात आली होती. यासाठी आई श्री देवी सातेरी बालगोपाळ मित्रमंडळाचे सहकार्य लाभले. तर यावेळी २ हजार पणत्यांची आरास करून दीपोत्सवही साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रामदेवतांच्या पालखी प्रदक्षिणेवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.

You cannot copy content of this page