Headlines

मठ ग्रामस्थांचे पुलाच्या बांधकामासाठी रस्ता रोको आंदोलन

चक्रीवादळामुळे मुख्य रस्ता वाहतुकीस बंद : पर्यायी मार्ग सुरक्षित नसल्याने ग्रामस्थ आक्रमक

*⚡वेंगुर्ले ता.१७-:* मठ येथे काल झालेल्या चक्रीवादळामुळे गावातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान रस्त्यांवर झाडे तुटून पडल्याने वाहतूक ठप्प होती. या बाबत संबंधित विभागाला कळवून ते सकाळ पर्यंत घटनास्थळी आले नाहीत त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू झाली. मात्र त्या मार्गावरील पूल वाहतुकीला धोकादायक असल्याने ग्रामस्थांनी पर्यायी मार्गावर आज सकाळपासून चार तास रास्ता रोको आंदोलन केले. अखेर जिल्हाधिकारी यांच्या समवेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पर्यायी मार्गावरील मोडक्या फुलाचा विषय मार्गी लावण्याचे सर्वानुमते ठरल्याने ग्रामस्थांनी आपला रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मठ भागात चक्रीवादळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठमोठी झाडे तुटून रस्त्यांवर व विजेच्या खांबावर कडून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. याबाबत तात्काळ ग्रामस्थांनी संबंधित विभागांना कळविले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत होते. मठ येथील पर्यायी मार्गावरील “मोडका पुल”धोकादायक आहे. तो दुरुस्त करावा अशी मागणी गेली कित्येक वर्ष ग्रामस्थ करत मात्र संबंधित विभाग त्याकडे कानाडोळा करत आहे. काल मठ येथे झालेल्या चक्रीवादळामुळे मुख्य मार्ग वाहतुकीस धोकादायक बनल्याने वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली होती. रात्री रुग्ण घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका त्या पुलावर अडकल्याने ग्रामस्थांनी तिला वाट मोकळी करून दिली. आणि त्या पुलावर दुर्घटना होऊ नये म्हणून आज सकाळपासून रस्ता बंद आंदोलन केले. यावेळी सरपंच तुळशीदास ठाकूर, उपसरपंच निलेश नाईक, माजी सरपंच किशोर पोद्दार, माजी उपसरपंच नित्यानंद शेणई, ग्रामपंचायत सदस्य दर्शना नाईक तसेच रवींद्र खानोलकर, अजित नाईक, उमेश नाईक, अमोल परब, संतोष परब, मनोहर मटकर, विद्याधर कडूलकर, भूषण परूळकर, प्रसाद मटकर, बंड्या ठाकूर, सुहास तेंडुलकर, सुनील तेंडुलकर, दयानंद गावडे, महेश धुरी, महादेव काजरेकर, गजानन मांजरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्यासह पोलीस तैनात होते. दरम्यान काही काळाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता प्रितम पवार, विनायक चव्हाण हे दाखल झाले. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसंना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब तसेच बाबली वायंगणकर, रवी शिरसाट आदी उपस्थित झाले. यावेळी ग्रामस्थांनी या पुलाबाबत असलेल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तर सरपंच ठाकूर यांनी ग्रामपंचायत स्तरावरून पुल होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परंतु तो अद्याप झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी केवळ चर्चा न करता हा पुलाचा विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाबरोबर एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले. त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले. प्रशासनाने मार्गावरील पडलेली झाडे तोडून रस्ता मोकळा केला,असून वीज वितरण कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

You cannot copy content of this page